यंदाची गोष्ट वेगळी नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली – आठही जिल्ह्यांत एकच आक्रोश आहे – “पीक करपलं”.
करपला शिवार :- शेतकरी हातबल

करपले शिवार
मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती तांबडी माती, उभे पिकलेले ज्वारीचे कणीस, आणि काळ्या आईवर प्रेम करणारा कष्टाळू शेतकरी. पण गेल्या काही वर्षांत हेच चित्र बदललंय. आता मराठवाडा म्हटलं की दिसतात त्या जमिनीला पडलेल्या भेगा, माना टाकलेली सोयाबीन, फुटलेली कापसाची बोंडं आणि करपलेलं शिवार.
यंदाची गोष्ट वेगळी नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली – आठही जिल्ह्यांत एकच आक्रोश आहे – “पीक करपलं”.
मराठवाड्यात शिवार करपतंय कसं?
जून महिन्यात मान्सून दाखल झाला. शेतकऱ्याने सावकाराकडून, बँकेकडून कर्ज काढलं. बी-बियाणं आणलं. एकरी ४ हजाराचं सोयाबीनचं बी, २ हजाराची तूर, ५ हजाराचं कापसाचं बीटी बियाणं. पेरणी झाली. जुलैमध्ये पावसाने चांगली साथ दिली. पीक तरारलं. शेतकरी स्वप्न पाहू लागला – यंदा तरी पोराची फी भरेल, लेकीचं लग्न करेल.
आणि मग आला ऑगस्ट. शेतकऱ्याच्या आयुष्यातला सगळ्यात क्रूर महिना.
१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट – सलग ३१ दिवस पावसाने दडी मारली. हवामान खात्याच्या भाषेत याला ‘ब्रेक’ म्हणतात, पण शेतकऱ्याच्या भाषेत याला ‘मरण’ म्हणतात. नेमक्या याच काळात सोयाबीनला फुलं लागतात, तुरीला शेंगा लागतात, कापसाला पात्या आणि बोंडं येतात. पाणी नाही मिळालं की फूल गळतं, शेंग वाळते, बोंड उमलतच नाही.
बीडच्या परळीपासून धाराशिवच्या उमरग्यापर्यंत, जालन्याच्या अंबडपासून लातूरच्या औशापर्यंत परिस्थिती एकच आहे.
सॅटेलाइटवरून पाहिलं तर शेतं हिरवी दिसतात, पण शेतात जाऊन ओंजळीत पीक घेतलं तर हातात राख येते. म्हणूनच खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले होते – “सॅटेलाइटवर हिरवं दिसतं, पण शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही.”
हे फक्त पीक नाही करपलं, प्रपंच करपलाय
एका एकर सोयाबीनचा हिशोब करा.
पेरणी ३००० + डिएपी २५०० + तणनाशक १२०० + फवारणी २५०० + मजुरी ६००० = जवळपास १५ ते १८ हजार रुपये खर्च.
आणि उत्पन्न? शून्य. काही ठिकाणी तर कापणी करायला सुद्धा परवडत नाही म्हणून शेतकरी रोटावेटर फिरवतोय.
आता विचार करा, हा खर्च कुठून आला? ८०% शेतकऱ्यांनी कर्ज काढलंय. पीक आलं नाही तरी सावकाराचं व्याज थांबत नाही. बँकेची नोटीस थांबत नाही.
घरातली परिस्थिती तर अजून वाईट.
जनावरांचा प्रश्न – सोयाबीनचा भुसा, ज्वारीची कडबा हाच जनावरांचा मुख्य चारा. पीक करपल्यावर चारा नाही. मग दूध नाही. दूध नाही म्हणजे रोजचे १००-२०० रुपये बंद. अनेकांनी जनावरं विकायला काढलीत. ४० हजाराची म्हैस २० हजारात विकावी लागते.
पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न – लातूर, बीड मधून पुण्याला, संभाजीनगरला शिकायला गेलेली पोरं. त्यांची फी, मेसचे पैसे. बाप फोन उचलत नाही कारण त्याच्याकडे उत्तर नाही.
आणि सगळ्यात मोठा प्रश्न – मानसिक खच्चीकरण. लोक बोलतात – “सगळं संपलंय”. आर्थिक अडचण, कर्जबाजारीपणा आणि शेतीची अनिश्चितता याने शेतकरी आतून तुटतोय.
मराठवाड्याचा दुष्काळ – निसर्गाचा की व्यवस्थेचा?
प्रश्न विचारला पाहिजे, मराठवाड्यात दर २ वर्षांनी दुष्काळ का पडतो?
१. पावसावर ७५% शेती अवलंबून आहे. धरणं आहेत, पण कालव्याचं पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचत नाही.
२. पिक पद्धत बदलली. पूर्वी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद ही कमी पाण्याची पिकं होती. आता सगळीकडे सोयाबीन आणि कापूस. या पिकांना वेळेवर पाणी लागतोच.
३. जमिनीचा पोत बिघडला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली. एक इंच पाऊस पडला की वाहून जातो, मुरत नाही.
४. एल निनो आणि हवामान बदल. हवामान खातं आधीच सांगतंय, यंदा पाऊस कमी पडणार. तरीही आपण तयारी करत नाही.
म्हणजे हा फक्त निसर्गाचा दुष्काळ नाही, हा नियोजनाचा दुष्काळ आहे.
या करपलेल्या शिवारातून बाहेर कसं पडायचं?
सरकारकडून अपेक्षा आहेतच – सरसकट पंचनामे करा, हेक्टरी ५० हजार मदत द्या, पीक विमा तात्काळ द्या. धाराशिवच्या शेतकऱ्याने मागणी केलीय की पीक कापणी प्रयोग करूच नका, १००% नुकसान आहे. ते खरं आहे. पण सरकार येईपर्यंत शेतकऱ्याने थांबायचं का?
१. पाणी अडवा, पाणी जिरवा हाच मंत्र: मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतात शेततळं, माती नाला बांध, CCT गरजेचे आहेत. जालना जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी शेततळं केलं, त्यांनी यंदा निदान एक पाणी वाचवलं आणि पीक वाचवलं.
२. पिकात बदल करा: सगळं सोयाबीन लावू नका. एका शेतात ४ पिकं लावा. एक गेलं तरी दुसरं वाचेल. तूर + मूग + ज्वारी + बाजरी हे मिश्र पीक मराठवाड्यासाठी वरदान आहे. कमी कालावधीची तूर, HTBT कापूस याचा विचार करा.
३. शून्य मशागत आणि आच्छादन: जमीन उघडी ठेवू नका. पेरणीनंतर लगेच पाचटाचं आच्छादन टाका. त्याने जमिनीतील ओल १५ दिवस जास्त टिकते. हाच १५ दिवस पिकाचा जीव वाचवतो.
४. बोलल्याने मन हलकं होतं. तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा विश्वासच खूप मोठा आहे

मराठवाड्याचा शेतकरी खूप सोशिक आहे. त्याने १९७२ चा मोठा दुष्काळ पाहिलाय, २०१५-१६ चा भीषण दुष्काळ पाहिलाय. प्रत्येक वेळी तो राखेतून उभा राहिलाय.
करपलेलं शिवार पाहून रडू येतं, खरं आहे. पण त्याच करपलेल्या शिवारात पुढच्या वर्षीचं बी दडलंय. आज भेगा पडलेल्या जमिनीत उद्या पहिल्या पावसाने सुगंध येणारच.
शेतकरी मित्रांनो, शिवार करपलं म्हणून हिंमत करपू देऊ नका. काळ्या आईने आजपर्यंत कधीच दगा दिला नाही. तिला जरा जपलं, तिचं पाणी अडवलं, तर ती पुन्हा हिरवी होणारच.
कारण मराठवाडा हा फक्त दुष्काळाचा नाही, तो जिद्दीचा व संघर्षाचा प्रदेश आहे.
डॉ. शिवाजी हुसे
संस्थापक – अध्यक्ष , शिवार संसद
( ‘आता उठवू सारे रान ‘ सदरातील लेख )
छायाचित्र : कवी लक्ष्मण खेडकर , ढाकणमाळ

पत्रकार अध्यक्ष
आदिनाथ गोरखनाथ ढाकणे. मो. नं. 9423183470





