Breaking
ब्रेकिंग

नागपंचमीला नागाची पूजा का करतात

0 1 0 3 3 0

नागांचा आदिमबंध

श्री एम यांच्या ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. सत्य हे बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा अदभूत असू शकते याची ती प्रचिती. श्री एम यांचे गुरू महेश्वरनाथ बसलेल्या गुहेत आकाशातून एक अग्नीलोळ येतो व त्यातून एक सर्प प्रकट होऊन बाबाजींशी संभाषण करून पुन्हा त्याच मार्गाने निघून जातो. त्यावर महेश्वरनाथ नागलोकाविषयी अनेक गोष्टी सांगतात. आकाशगंगेमध्ये सात ग्रह व अठरा चंद्र असलेली एक सौरमाला असून त्यापैकी एका ग्रहाला सर्पलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी फणा असलेली सर्प जमात वास्तव्य करते. त्या लोकांना नागदेवता असे म्हटले जाते. अनेक पुरातन संस्कृतीमध्ये नागपुजेला जे स्थान दिले आहे ती पूजा म्हणजे प्रगत अशा नागसंस्कृतीला दिलेली एक मानवंदनाच ठरते.

सर्पकुळात अधिष्ठाता। वासुकी गा मी कुंतीसुता। नागांमाजी समस्ता। अनंतु तो मी।।
-ज्ञानेश्वरी अध्याय १० वा

श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतात, सर्पांचा राजा वासुकी मी तर नागांचा राजा अनंत मी यावरून या कुळाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अरूण ताह्मणकरांचे ‘सर्पंगंध’ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. त्यात नागांचे अतिशय सुरस वर्णन केलेले होते. त्यांनी नागांचा व कुंडलिनी शक्तीचा संबंध जोडलेला होता.

नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें। वळण घेऊनि आलें, सेजे जैसें।। २२२
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी, निजैली असे।। २२३
-ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा

श्रीज्ञानेश्वर जेव्हा कुंडलिनीचे वर्णन करतात तेव्हा ते नागाचा व सर्पांचा आधार घेतात. यावरूनही त्यांचे महात्म्य आपल्या लक्षात यावे. सर्पकूळ किती आदिम तर रामचरितमानसमध्ये विनता व कद्रुची एक कथा आली आहे, महाभारताच्या आदिपर्वामध्येही ती येते. दक्ष प्रजापतीच्या दोन कन्या, विनता व कद्रु यांनी कश्यप ऋषींसोबत विवाह केला. एकदा प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा कद्रुने एक हजार पराक्रमी पुत्रांची आई होण्याचे व विनताने दोनच परंतु कद्रुच्या पुत्रांपेक्षा अधिक पराक्रमी ते असावेत असा वर मागितला. त्याप्रमाणे कद्रुला एक हजार पुत्र झाले. तेच सर्प असे मानले जाते. विनताचे मुलगे अरूण (हा सुर्याचा सारथी) व दुसरा गरूड. तर असे हे महापराक्रमी सर्प. गरूडाने अमृतकुंभ आणून ज्या चऱ्यांवर ठेवला तेथे अमृतकण सांडले असतील म्हणून सर्पांनी ते चरे जिभेने चाटण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची जीभ मधोमध कापली गेली व त्या दोन झाल्या असाही एक संदर्भ महाभारतात आहे तर सर्पांचा उल्लेख महादेवपुराणातदेखील आढळतो. मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते सृष्टीला जाळत असताना महादेवाने ते प्राशन केले हे त्यात आलेच आहे परंतु समुद्रात जे विष पसरले होते ते पिण्याचे काम या सर्पांनीच केले आणि मानवजगताला अभय प्रदान केले. नागांचा संदर्भ असा आदिम आहे. आपण पुराणकाळापासून देवघरात ज्या नाग-नरसोबाची पूजा करतो तो म्हणजे नागांप्रती कृतज्ञता भावच आहे. नरसोबा म्हणजे नृसिंह महाराज. प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची ती कथा. दुसरी कथा कालियामर्दनाची, तिसरी कथा जिवत्यांची तर चौथी बुध-बृहस्पतीच्या युद्धाची. या कथा आपल्याला काय सांगतात? केवळ कृष्णाने कालियामर्दन केले, अथवा जिवत्यांनी बाळांना मांडीवर घेऊन जोजावले इतकेच का? नाही नाग-नरसोबाच्या पुजनातून आपण हा बोध घेतला पाहीजे की आपली संस्कृती ही आदिम आहे. तिचा आपण अभिमान बाळगला पाहीजे. चमत्कारांचा भाग आपण सोडून देऊ थोडावेळ परंतु पुराणकाळापासून नागजमात ही मानवाची मदत करत आली आहे, ती अगदी शेतातील उंदीर नष्ट करण्याच्या रूपाने असो किंवा आजच्या मॉडर्न सायन्समधील अनेक औषधे हे सर्पांच्या लाळेपासून अथवा विषापासून बनवण्यात आले आहेत येथपर्यंत असो. या आदिम जमातीने मानवासाठी मैत्रीचा हात नेहमी पुढे केला आहे. मुळात महाभारतात तर त्यांना मानवाचाच नव्हे त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचा दर्जा दिला आहे. काही शास्त्रांमध्ये असेही येते की जेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांनी आपल्यासमोरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपले पितर नागाच्या माध्यमातून येऊन ते प्रश्न सोडवतात. यातीलही अतिशयोक्ती किंवा फॅण्टसीचा भाग आपण सोडून देऊ, त्यांचे दर्शन म्हणजे मानवजातीसाठी एक आश्वासकता घेऊन येते एवढे जरी यातून आपण घेतले तरी सार्थक.

-डॉ.प्रशांत दामोदर भरवीरकर
9503677740

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे