Breaking
ब्रेकिंग

सद्भावना सायकल यात्रा  नांदेड ते आहिल्यानगर  आणि वृत्तांत क्र.2

0 1 0 3 3 0

सद्भावना सायकल यात्रा  नांदेड ते आहिल्यानगर  आणि वृत्तांत क्र.2

तरुणाईशी सातत्यपूर्ण संवाद आणि संस्था – संघटनांची कृतिशील वज्रमुठ यातूनच देशाचे विघटन आणि अराजक टाळणे शक्य

नांदेड , दिनांक 1 जानेवारी 2026

देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता आणि त्यावर आधारित संघर्ष आणि हिंसा वाढत चालले आहेत.
तरुणाईशी सातत्यपूर्ण संवाद तसेच लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण प्रश्नांवर संस्था – संघटनांची भक्कम वज्रमुठ उभी राहिली तरच देशाचे विघटन आणि अराजक टाळणे शक्य असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक बेलखोडे यांनी सांगितले .या संदर्भात सद्भावना सायकल यात्रेमुळे आशादीप प्रज्वलित होत असल्याचे
डॉ. बेलखोडे यांनी नमूद केले.

डॉ. अशोक बेलखोडे यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारासमोर सद्भावना सायकल यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बीज भाषण केले.त्यामुळे सायकल यात्रेचे औचित्य स्पष्ट झाले..
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या शास्त्र महाविद्यालयात देखील तेथील विद्यार्थी आणि सायकल यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांशी डॉ. बेलखोडे यांनी दीर्घ संवाद केला..

डॉ. बेलखोडे म्हणाले की,भारत देशात प्रगती आणि विकासाचे जे चित्र मांडले जाते , त्याचा अनुभव आपल्याला खरोखरच येतो का याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. त्या आधारे स्वतःचे मत बनवायला हवे. सध्याचा भारत देश
जाती – धर्म – भाषा – लिंग यावर आधारित भेदभाव, शोषण आणि संघर्ष यांनी पूर्णतः ग्रासला आहे. राजकारण – समाजकारण आणि प्रशासनातही भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण, बेजबाबदारी यांचा कडेलोट होत आहे.अशा स्थितीत देशाचे मानसिक विघटन आणि अराजक रोखण्यासाठी तरुणाईची सद्भावना सायकल यात्रा औचित्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. बेलखोडे म्हणाले . गंगोत्री तिच्या
उगमाच्या जवळ अगदी लहान प्रवाह आहे. पुढे तिचे विशाल गंगा नदीत रूपांतर होते. तसे सद्भावना सायकल यात्रेत आज संवेदनशील मोजके कार्यकर्ते सहभागी आहेत. परंतु पुढे याचेच रूपांतर बदल घडवणाऱ्या मोठ्या चळवळीत होऊ शकते, असे डॉ. बेलखोडे म्हणाले.

स्नेहालय संस्थेने वर्ष 2009 पासून आजवर विविध 11 जिल्हा – राज्य – राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल यात्रा काढल्या. त्यामुळे महामानव बाबा आमटे यांनी 1980 च्या दशकात काढलेल्या *भारत जोडो* सायकल यात्रांची भावधारा आणि उद्देश पुनरुज्जीवित केल्याचेही भारत जोडो सायकल यात्री असलेल्या बाबा सूर्यवंशी आणि डॉ. बेलखोडे यांनी यावेळी नमूद केले.

मराठवाड्यातील संवेदनशील जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचा संदेश ही यात्रा देत आहे.
स्नेहालय ,अनेक समविचारी कार्यकर्ते आणि संस्थांनी या सायकल यात्रेचे संयुक्तरित्या आयोजन केले आहे. यामध्ये रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांचेही सहकार्य मिळाले.

मान्यवरांची उपस्थिती
——————————

नांदेड येथील सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे डॉ.बेलखोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी सरदार कुलवंत सिंग, एक पाय नसतानाही बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल यात्रेत सायकलवर सहभागी झालेले बाबा सूर्यवंशी, सी. ए. विजय मालपाणी आणि सी. ए.हर्षद शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितेश मालेवाल,
सुरेश अंबुलगेकर ,
गुरुजीत सिंग खालसा,
उमेश गारुडकर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मराठवाड्यातील संघटन आणि नेतृत्व करणारे प्रा. बालाजी कोंपलवार,
दैनिक प्रजावाणी चे संपादक शंतनु आणि धनंजय डोईफोडे यांनी सायकल यात्रेस हिरवा झेंडा दाखविला.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यात्रेसाठी आपला प्रतिनिधी आणि संदेश पाठविला. रोटरी आणि लायन्स क्लबचे स्थानिक संयोजक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

किनवट ( जिल्हा नांदेड)येथे गेली तीन दशके साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून गरिबांना वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांनी यावेळी भारत जोडो सायकल यात्रेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.
डॉ. बेलखोडे म्हणाले की,भारत जोडो सायकल यात्रेमुळे आपल्या देशाचे समाजमन आणि समाजस्थिती युवावस्थेत समजली. समाजाचा एक अंधारलेला कोपरा निवडून तेथे सेवा आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणे म्हणजे देशभक्ती आणि देशसेवा हे स्पष्ट लक्षात आले. त्यामुळेच आपल्यासह असंख्य युवा सायकल यात्री समाजाच्या तळागाळात जाऊन प्रत्यक्ष काम करू लागले. स्नेहालयाच्या सायकल यात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते देखील या प्रेरणेतून अंधारवाटा उजळत असल्याचे डॉ.बेलखोडे आणि श्री. सूर्यवंशी यांनी नमूद केले..
लोकनायक अण्णा हजारे यांच्या चळवळीची मराठवाड्यात उभारणी करण्यासाठी 3 तपे अविरत कष्ट घेणारे निवृत्त प्रा. बालाजी कोम्पलवार यांनी नमूद केले की,यापूर्वी कधीही नव्हती एव्हढी चळवळीची आणि सामाजिक दबाव गटाची देशात गरज आहे. भय, भ्रष्टाचार ,भेदभाव आणि भूक यांचा मुकाबला अटळपणे करावा लागेल.

सरोपा सन्मान
=============

हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख कुलवंत सिंग यांनी गुरुद्वारा तर्फे सायकल यात्रीचा
सन्मानाचे भगवे वस्त्र म्हणजेच सरोपा देऊन सन्मान केला. सहसा आपल्या दैनंदिनीत अशा सार्वजनिक भेटीगाठी न करणारे हे शीख संत आदल्या दिवशी आपल्या टीमला भेटले. आपला उद्देश ऐकून त्यांनी खूपच आनंद व्यक्त केला. गुरु नानकदेव यांचाच समतेचा विचार सायकल यात्रा पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दिलेल्या वेळी उद्घाटनासाठी ते उपस्थित राहिले. त्यापूर्वी सर्व सायकल यात्रेकरूंनी पहाटेच गुरुद्वारा येथे पोहोचून दर्शन घेतले . येथील लंगर मध्ये प्रसाद घेतला.

रामानंद तीर्थक्षेत्र

श्री कोम्पलवार सर आणि श्री.धनंजय डोईफोडे यांच्या परिचयातून नांदेड एज्युकेशन सोसायटी ( NES ) या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी संवादाची संधी उद्घाटनानंतर लगेचच आम्हाला मिळाली.
सायकल यात्रेचा उद्देश येथे आम्ही सांगितला आणि प्रबोधनात्मक गाणी सादर केली.

NES शिक्षण संस्था मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी काढलेली आहे.
या संस्थेत 80 एकर जागेवर कला ,वाणिज्य आणि शास्त्र शाखांमधील अत्यंत दर्जेदार शिक्षणाची सोय आहे. एकट्या शास्त्र विभागात 14 विषयात पदयुक्त शिक्षणाची सोय आहे.

शिक्षक किंवा प्राध्यापक यांना नेमताना केवळ गुणवत्तेच्या आधारावरच येथे निवड केली जाते. कोणत्याही भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला जात नाही. अशी प्रथा आजवर जपलेली ही कदाचित एकमेव शिक्षण संस्था असावी. संपूर्ण महाराष्ट्राला वैचारिक प्रबोधनात परिचित असलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे नरहर कुरुंदकर. नांदेड शहरात भाग्यनगर कॉलनीत कुरुंदकर राहायचे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आवारात त्यांचे भव्य स्मारक उभे राहिले आहे. एखाद्या समर्पित प्राध्यापकाचे त्याच महाविद्यालयात त्याचा प्रबोधन वारसा पुढे चालवणारे स्मारक उभे राहणे ही एक दुर्मिळ घटना आहे. स्मारकाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
सामाजिक प्रबोधनाशी सायकल यात्रेचे नाते

प्रजावाणीचे संपादक आणि मालक श्री शंतनू आणि श्री धनंजय डोईफोडे यांनी त्यांच्या घरी आपल्या नियोजन समिती सदस्यांना बोलावले.
मराठवाडा मुक्ती संग्रामापासून मराठवाड्यातील विकासाचे विविध प्रश्न 6 दशके धसास लावणाऱ्या *प्रजावाणी* दैनिकाचे संपादक स्व.सुधाकरराव डोईफोडे विकासवादी दृष्टिकोनाचा परिचय या निमित्ताने झाला.

त्यानंतर नांदेड मध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून उभे राहिलेले लायन्स नेत्रालय आम्ही पाहिले. फक्त वीस रुपयात अत्यंत दर्जेदार नेत्र तपासणी येथे होते.अत्यल्प शुल्कात उच्च दर्जाचे नेत्रोपचार येथे गरीब परिस्थितीतील रुग्णांना मिळतात.येथे रुग्णांची प्रचंड गर्दी होती.
येथील लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी आपुलकीने यावेळी उपस्थित होते.

त्यांनी त्यांचे नेत्रसेवेचे काम आणि त्यामागील दृष्टिकोन समजावून सांगितले…

भव्य उत्कठ स्वागत
==============

नांदेड येथून आमचा प्रवास हिंगोली कडे सुरू झाला.
रस्त्यात औंढा नागनाथ येथे अनिल अग्रवाल यांनी चहापान दिले. येथील बस स्थानकावर त्यांचे कॅन्टीन आहे. पुढे हिंगोली येथे मोठा कार्यक्रम जायंट्स क्लब ने आयोजित केलेला असल्याने आम्ही येथून तातडीने हिंगोली कडे निघालो.
येथे मागील 20 वर्षांपासून जायंट क्लबचे काम
रत्नाकर महाजन पाहतात . या क्लबचे ते विभागीय उपाध्यक्ष आहेत. येथे महावीर भवन हे मंगल कार्यालय आहे .त्यांनी जैन समाजाच्या ट्रस्ट मार्फत हे उभारले आहे. तेथेच आमच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाची ,सर्वधर्म प्रार्थनेची, लोकसंवादाची, जेवण आणि निवासाची सोय श्री महाजन आणि त्यांच्या जायंट उपलब्ध केली होती .

यावेळी आम्हाला श्याम कळमनुरीकर , डॉ. संजय नाकाडे , संजय खिल्लारे,
, किरण कुमार लाहोटी ,
डॉ. नामदेव कोरडे ,
संजय भन्साळी,
संजय घन ,बाळा पवार ,
डॉ. गणेश आवचार ,
डॉ. श्रीधर कंदी ,
नीलकंठ गायकवाड ,
सुदर्शन महाजन ,
, महेश शहाणे ,
आशिष पिंगाळकर ,
दिनेश गुप्ता ,
श्याम रावणी बांगर ,
योगेश महाजन ,
प्रो. सुरेंद्र साहू ,
हर्षवर्धन परसवाळे ,
रेणुका ताई बंगाले ,
ज्योती कांबळे ,गायत्री वाढवे, योगेश महाजन असे अनेक जाणीव संपन्न सामाजिक कार्यकर्ते आम्हाला भेटले.. सुमारे दोन तासांच्या संवादात त्यांनी स्नेहालय, फारूक बेग यांचे स्नेहप्रेम, नंदाताई पांडुळे यांची राजमुद्रा करिअर अकॅडमी, शेवगावचे उचल फाउंडेशन, अहिल्यानगरचे दिव्यांगांसाठी काम करणारे अनामप्रेम , श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे संस्था, कोपरगाव येथील गोदामाई फाउंडेशन ,अशा विविध संस्थांच्या कार्याचा परिचय त्यांच्या प्रतिनिधींनी विविध भेटी आणि संवादात करून दिला.

यापुढे हिंगोली मधील सर्व जाणीव जपणारी सामाजिक टीम या संस्थांच्या भेटीला येईल असे संयोजकांनी सांगितले.

3 दशके अण्णा हजारे यांच्या चळवळीत काम करणारे माजी सैनिक सय्यद मीर, डॉ. ज्ञानेश्वर धायगुडे , विश्वास भगवतीकर आदी भेटायला आले. प्रत्येकाचा आग्रह होता की, सर्व सायकल यात्रेतील कार्यकर्त्यांना घरी जेवण किंवा नाश्ता तरी द्यायचा. आता तर शक्य नव्हते.पण आम्ही पुढच्या सायकल यात्रेसाठी त्यांचे बुकिंग करून ठेवले.

पथनाट्य,संतांची भजने, प्रेरणादायक गीते, थेट लोकसंवाद अशी माध्यमे यात्रेत वापरली जात आहेत. आरूपा गौडा , साक्षी नरवडे यांच्या खणखणीत प्रार्थना आणि भजने यांनी वातावरण भारून जाते…..

विविध विषयात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, प्रत्यक्ष समाजात सेवाकाम करणाऱ्या महिला आणि मुली यात्रेत काही काळासाठी सहभागी होत आहेत.
सायकल यात्रेत 15 ते 79 वर्षांचे पूर्णवेळ 50 यात्री आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील हौशी तरुण-तरुणी यात्रेसोबत 10 किलोमीटर सायकल चालवतात.
दररोज संध्याकाळी मुक्काम असलेल्या ठिकाणच्या नागरिकांसोबत सर्वधर्म प्रार्थना यात्री करतात.
जातीय आणि धार्मिक संघर्ष घडलेल्या ठिकाणी त्यांचे आयोजन करण्यात येते.
पुढील दोन दिवसात हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सायकल यात्रेचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहेत…

विकास सुतार
9011026472

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे