Breaking
ब्रेकिंग

पाण्यासाठी झपाटलेलं गाव… !! पाणीदार केंदूर… एक चळवळ.. !!

0 0 4 7 8 9

पाण्यासाठी झपाटलेलं गाव… !!
पाणीदार केंदूर… एक चळवळ.. !!

पाणी लय गरजेची गोष्ट हाये..
आंघूळ करायला, भांडी घासायला, कपडे धुवायला, जेवण बनवायला पाणी लागतं.. पाणी लय चांगलं असतं.. पाणी नसल तर पाण्यासाठी सगळे तरसणार आणि हळू हळू मरणार…
२००३ साली माझ्या इंग्रजी मिडीयममध्ये चौथीत शिकत असलेल्या मुलाने(निरंजन) मराठीत पाणी विषयावर लिहिलेला त्याच्या भाषेतील निबंध…

पाणी अडवा पाणी जिरवा…. !!
पाणी हेच जीवन आहे…. !!
जल है तो कल है… !!
हि सतत ऐकण्यात येणारी आणि भिंतीवर शोभून दिसणारी वाक्य..

पृथ्वीवर असलेल्या एकूण २८% जलसाठ्यापैकी केवळ ०.३% पाणी पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असतं. पर्यावरणाचा होत असलेला र्हास, अपरिमित वृक्षतोड, मानवाचं जंगलभागावरील स्वतःच्या सोयीसाठी होत असलेलं अतिक्रमण आणि निसर्गावर मात करण्याची आत्मघातकी विनाशकारी वृत्ती.. जागतिक आणि गावपातळीवरील सुद्धा वाढत जाणारी लोकसंख्या विचारात घेता भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष आणि टंचाई प्रकर्षाने जाणवणार हे निर्विवाद आणि डोळ्यासमोर दिसत असलेलं धडधडीत सत्य आहे… पण सुधारेल तो माणूस कसला…

*पृथिव्या त्रिणी रत्नानि अन्न जलं सुभाषितम्।*
*मूढै पाषाणखण्डित रत्नसंज्ञा प्रचोदयेत॥*

पृथ्वीवर अन्न, पाणी चांगले विचार आणि वाणी ही तीनच खरी रत्न आहेत पण मुर्ख लोक पाषाणाच्या तुकड्यांना(हिरे माणिक मोती) अनमोल रत्न समजून साठवणूक करून ठेवतात.. असं संस्कृतमधील सुंदर सुभाषित आहे…

झाडे लावा झाडे जगवा.. जमिनीची धूप थांबवा.. पाणी अडवा पाणी जिरवा या सारख्या शासकीय योजनांसाठी सरकार बरेच प्रमाणात पैसा खर्च करत असतं.. तरीही परिस्थिती जैसे थे..

आता माझं पाल्हाळायन बंद करतो….
सांगायचा मुद्दा हाच की……

गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करायला पेटून उठत नाही.. असं डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे.. त्याचप्रमाणे तहानलेल्याची पाण्याची वणवणता थांबविण्यासाठी आता गावातील लोकांनीच पेटून उठण्याची गरज आहे… केंदूर आणि एकूणच शिरूर तालुका व महाराष्ट्रने २००३ व २०१८ चा दुष्काळ अनुभवला आहेच. अनियमित आणि वरूणराजाची लहरी कृपादृष्टी(अर्थात माणसांनीच निर्माण केलेली..अपरिमित वृक्षतोड, उघडेबोडके डोंगर, उजाड माळरानं..पाऊस क्वचितच किंवा नगण्य आणि पडलेल्या पावसाची साठवून ठेवण्याची कोणतीही पूर्तता नाही) त्यामुळे भीषण तीव्र ऊन्हाळ्याची परिस्थिती केंदूरकरांनी ऐन पावसाळ्यात अनुभवली आहे…. वाडी वस्तीवरील लोकांना एक एक हंडा पाण्यासाठी कितीतरी पायपीट करावी लागली.. डोळे सतत पाण्याच्या टँकरवर लागलेले आणि त्यातही अनियमितता.. पोटच्या लेकरावाणी सांभाळलेल्या जनावरांची दैनीय अवस्था थिजलेल्या डोळ्यानी बघवत नव्हती म्हणून त्यांची बाजारात केलेली रवानगी.. सगळं एकदम भयावह आणि असह्य होतं. फेब्रुवारी महिना लागताच गावोगावी पाण्याचे टँकर जनावरांचा चारा छावण्याचा भीषण अनुभव घेतला आहे….

केंदूरचे सुपुत्र आयकर उपायुक्त श्री. प्रशांत गाडेकर साहेब आणि डाॅ. श्री. सुमंत पांडे साहेब यांनी केंदूरला पाणीदार करण्याचा विडा उचलला आहे… गावातील बरेचसे लोककार्यकर्ते या महान कार्यात स्वयंस्फुर्तीने सहभागी झालेत.. कोणी श्रमदान करतोय.. कोणी आर्थिक मदत देतोय.. पण म्हणावा असा जोर अजूनही पकडलेला नाही…
डाॅ.श्री. सुमंत पांडे साहेबांची पुढील योजना फार दुरदृष्टीपणाचे द्योतक ठरणार आहे… १९६५ व १९७२ सालीही असाच भयानक हाहाकारी दुष्काळ पडला होता त्यावेळी सरकारने गावोगावी तळी तलाव विहीरी खोदण्याचे व शेतावर बांध घालण्याचे काम रोजगार हमी योजना व लोकांच्या प्रत्यक्ष श्रमदान सहभागातून केले होते…
यशदाच्या जलदुतानी अहोरात्र कष्ट करून केलेला सर्व्हे असा सांगतोय की केंदूर आणि पंचक्रोशीत(महादेववाडी, भगतवस्ती, माळीमळा, सुक्रेवाडी, पर्हाडमळा,भोसूरस्थळ आणि पश्चिमेकडील शेंडकरवस्ती, साकोरदारा, पिंपळाखोरी इथं खूप मोठी जलक्षेत्र आहेत) अंदाजे चाळीस ते पन्नास मानवनिर्मित तलाव आहेत.. या सर्व तलावातील गाळ काढून ते पुनरुज्जीवीत करण्याचा यशदाचा व सर्व ग्रामस्थांचा निस्पृह मानस आहे.. पडणारे पावसाचे पाणी अडवून आणि ते भूगर्भात धरती मातेच्या उदरात साठवून ठेवणे आणि गरजेप्रमाणे त्याचा योग्य वापर करणे हा प्राधान्य क्रम असावा. (जमीन वाढणार नाही किंवा पाण्याची खाली गेलेली पातळी अशी अचानक वर येणार नाही.. त्यासाठी आहे त्या स्त्रोतांचा यथायोग्य वापर करून घेतला पाहिजे…) सध्या लोकऊर्जेने पाणीदार केंदूर करण्याचे सुरू असलेले काम पाहता ही कठीण वाटणारी असाध्य गोष्ट सहज साध्य होईल असा विश्वास वाटतोय….

*केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे..*
यासाठी फार मोठी सामाजिक आर्थिक चळवळ उभी करण्यास लागणार हे ओघाने आलेच.. त्यासाठी गावकरी लोकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रमदान आणि दानशूर सेवाभावी लोकांनी आर्थिक मदत करण्याची गरज आहे… असं त्यांचं आवाहन आहे… बाकी ज्यांच्या त्यांच्या परीने ते एकाच ध्यासाने झपाटून काम करीत आहेतच.

दोन मिनिटं डोळे बंद करून स्वप्न बघा.. केंदूर आणि बारा वाड्यात पन्नास एक तलाव आणि विहीरी पाण्यानं काठोकाठ भरलेल्या आहेत… शेती शिवार फुललेलं आहे.. सगळीकडे हिरवळ आणि हिरवीगार झाडं डौलाने डुलताहेत… स्वप्नभंग होऊ द्यायचा नसेल तर आता सगळ्यांनी एकजुटीने जोमाने पेटून उठावच लागेल…

*न मर्षयन्ति चात्मानं संभावयुतिमात्मना।*
*अदर्शयित्वा शुरास्तू कर्म कुर्वन्ति दुष्करम्॥*
धाडसी जिद्दी झपाटलेले लोक आपल्या मुखानं आपली प्रशंसा कधीच करत नाहीत.. अगदी अवघड असाध्य कठीण काम करून दाखवून ते आपल्या वीरतेची ग्वाही देत असतात..

*चिंतनीया ही विपदां आदावेव प्रतिक्रिया।*
*न कूपखनं युक्त प्रदीप्ता वन्हिना गृहे॥*
ज्याप्रमाणे घर आगीच्या भक्षस्थानी पडत असताना विहीर खोदण्याचं काम करणं सयुक्त नाही त्याप्रमाणे एखादी विपदा संकट आल्यास त्यावर चिंता करत बसणं निष्फळ प्रतिक्रिया आहे…

*दाखवूनिया एकीचे आता हे बळ..*
*करूया केंदूरगाव जलसंपन्न सुफल..*
*नको आता नुसता कळवळा वायफळ..*
*वेळ आहे आता दाखविण्याची तळमळ..*

पाणीदार करून गाव सज्ज भागविण्यास तहान
*लोकप्रेरणेतून सहज साध्य होईल कार्य महान*
*विसरूनी सारा भेद मान आणि अपमान*
आपला आपण करूनी घ्यावा विकास सर्वांगीण

*खात्री आहे होईल केंदूर पाणीदार..*
*पसरेल किर्ती गावाची मग सर्वदूर…*

*उम्र हमे थका नही सकती….*
*ठोकरे हमे गिरा नही सकती…*
*जीतने की हो मन मे जिद्द अगर….*
*परिस्थिती कोई हमे हरा नही सकती..*

???? धन्यवाद…. !!

……… ✒️✒️ बीएचडी…. !!
बाळासाहेब हनुमंत ढवळे…
२५ मार्च २०२१

1/5 - (1 vote)

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे