गुरु शुक्राचार्य महाराजांचे ( शुक्र ग्रहाचे ) तपश्चर्या व संजीवनी मंत्र उच्चारलेले ठिकाण कुठे आहे……??

गुरु शुक्राचार्य महाराजांचे ( शुक्र ग्रहाचे ) तपश्चर्या व संजीवनी मंत्र उच्चारलेले ठिकाण कुठे आहे……??
कोपरगाव ला कोपरगाव हे नाव का पडले..??
विवाह मुहूर्त नसताना कोपरगाव येथील दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिरात विवाह संपन्न कसे होतात…??
याचा सविस्तर वृत्तान्त 🙏👇🏻
🙏 गुरु शुक्राचार्य महाराज मंदीर 🚩
महाराष्ट्रातील शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेले कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदिर आणि आश्रम परिसर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही ( बेट कोपरगांव ) हे ब्रम्हदेव पुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र
व दैत्यांचे गुरु शुक्राचार्य उर्फे भार्गव यांचे हे कर्मस्थान असून त्यांनी तप व वास्तव्य केलेला हा परिसर आहे. त्यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्त्व प्राप्त झाले असून त्याची आख्यायिका अशी आहे.
समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्य कुळांचा नाश हा निश्चित झाला. तो होऊ नये व दैत्य कुळ पुढेही चालू रहावे त्यासाठी दैत्यांनाही अमरत्व प्राप्तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्चर्या करुन गायत्री व महामृत्यूंजया पासून तयार झालेला ” संजीवनी ” मंत्र की , ज्या योगे मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्त करुन घेतला व त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करुन देवांविरुध्द युध्दासाठी संजीवन करत असत. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्तच झाले. त्यासाठी देवांनी बृहस्पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्हणून सर्व देव व बृहस्पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्तगत करण्यासाठी बृहस्पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्यास गुरु शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्थान गोदावरीच्या पैलतीरावर होते. ते स्थान कचेश्वर मंदीर म्हणून प्रसिध्द असून ते शुक्लेश्वर मंदीराच्या उत्तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्वर यांचे एकत्रित पिंडीच्या स्वरुपात स्थापित आहे. गोदावरीच्या ऐलतीरावर गुरुचे स्थान व पैलतीरावर शिष्याचे स्थान आहे. पूर्वीच्या नदीवरील घाट व त्याच्या खुणा अजूनही मंदीराच्या समोरील श्री विष्णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्याकडून कच व देवयानी यांना हा ” संजीवनी ” मंत्र मिळविल्याचे संजीवनी पाराचे स्थान असून त्यात मंत्र मिळाल्यानंतर स्वर्गातील देवगण कचेश्वरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आले. त्यामुळे इतर देवांच्याही पिंडीच्या स्वरुपात प्रतिकात्मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्थान अत्यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्तांची धारणा आहे.
गुरुची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्हणजे हल्लीच्या शुक्लेश्वर मंदीराचे स्थानावर नित्यनियमाने येत असत. या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या -जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी आपल्या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
सर्व शिष्यांमध्ये कच हा अत्यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्यांमध्ये गुरुचा लाडका शिष्य होता. ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे. त्यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्टी होती. द्वेषापोटी त्यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्यामुळे तिने कचास दोन्ही वेळा वडिलांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परिणामी सर्व दैत्य संतापले व त्यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्याचे ठरविले. पुन्हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्यांचे गुरु असल्यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्याचा गैरफायदा घेवून दैत्यांनी डाव साधला. कच दिसेना म्हणून देवयानीने आपल्या वडिलांकडे कचासाठी पुन्हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की कच हा आपल्याच पोटात आहे. ही गोष्ट त्यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्या योगे मी तो मंत्र म्हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्या हट्टाने व मद्य व्यसनामुळे जी गोष्ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्हा त्यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदिरासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा-पुन्हा जिवंत करण्याची शक्ती शुक्राचार्यांमध्ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्य झाल्यामुळे मूळ देवलोकी जाण्यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास लग्नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडिलाच्या उदरातून बाहेर आल्यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्टीचा राग येवून वअपेक्षाभंगाच्या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्त करुन चाललास त्या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकूल आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे यावर क्रोधीत होऊन कचदेव हि देवयानीस शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल. अशारितीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावतो व कचदेव हे देवलोकी निघून जातात.
पुढे ही शापवाणी खरी ठरुन शुक्राचार्य ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील ” ययाती ” राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे.
कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते. एकदा वनविहारास गेली असताना असूर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानी एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते. आपला जीव वाचविण्यासाठी धावा करित असताना तेथे शिकारीसाठी आलेले महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती’ आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवितात. हात हातात घेतल्याने त्यांच्यावर ‘पाणीग्रहण संस्कार’ होतात. (पाणिग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीया कुठल्याही परपुरुषांच्या हातात आपला हात देत नसत. जर चुकूनहि हात हातात घेतला गेला तरि त्यांचे ‘पाणिग्रहण संस्कार’ झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे.) पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हिस क्षत्रिय राजा ययाती यांच्या बरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते. पाणीग्रहण झाले त्यावेळी ग्रह, नक्षत्र अनुकूल नव्हते व सिंहस्थ काळ असल्यामुळे कुठलाहि शुभमुहूर्त निघत नव्हता. म्हणून गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातीरी ‘विवाह सिद्ध होम’ करुन आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करुन ग्रह नक्षत्र अनुकूल करुन घेतले व या पावन भूमीस असे वरदान दिले की, यापुढे केव्हाही या भूमीत कोणतेही पवित्र कार्य (विवाह, इत्यादी शुभकार्य) करण्यास कुठलाही मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वेळ व सिंहस्थकाळ पहावा लागणार नाही व येथे केलेले शुभकार्य हे विशेष यशस्वी होतील.
(कोपरगांवचे माजी खासदार कै. शंकररावजी काळे साहेब व कै. बाळासाहेब सातभाई व इतर अनेक मान्यवरांचे विवाह याच मंदिरात झालेले आहेत.)
हि कथा हजारो-हजारो वर्षापूर्वी घडलेली असून गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या तपाने पावन झालेली हल्लीची बेट कोपरगांव पावन भूमी आहे. अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज व परम शिष्य कचदेव यांच्या कोटीकोटी आशिर्वादास प्राप्त व्हावे.
महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती यांचेशी विवाहबद्ध झाली त्यांच्या पुढील झालेल्या यदु वंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती आणि त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य, पांडव, कौरव यांचा जन्म झालेला आहे.
आजही शुक्राचार्यांचे हे स्थान त्यांच्या तपोबलाने पुनीत झाल्यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्हाही विवाह होतात. (कोपरगांवचे माजी खासदार कै. मा. शंकररावजी काळे साहेब व अनेक मान्यवरांचे विवाहसुध्दा याच मंदिरात झाले आहे )
या सर्व गोष्टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्या ओव-या पूर्वी येथे असलेल्या पेशव्यांच्या वाडयाच्या अवशेषातून बांधलेल्या आहेत. तसेच समोर श्री विष्णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्या पायथ्याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्ही मंदिराच्या मध्यात ” संजीवनी पार ” म्हणजे येथे कचास ” संजीवनी ” विद्या प्राप्त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्याचे हे स्थान असून याचे उत्तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्वर मंदिर) असून त्या स्थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्वर) गुप्त रुपाने तेथे आल्यामुळे त्यांचेही श्री त्रिंबकेश्वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्त रुपाने आल्यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. कचेश्वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्याचा रिवाज आहे.
या पूर्वीच्या भागात आपण कोपरगाव येथील शुक्राचार्य ऋषींच्या मंदिराचा इतिहास पाहिला. आजच्या भागात भृगु कुलोत्पन्न असूनही शुक्राचार्य दैत्य गुरू कसे झाले याचा इतिहास देत आहे, त्या बरोबरच त्यांची वंशावली चा फोटो पण देत आहे.
🌹 *पौराणिक कथा* 🌹
*भृगुपुत्र शुक्राचार्य यांची दैत्य गुरू कसे झाले कथा*
श्रीरामांनी वसिष्ठाला विचारले,”हा बाहेरील संसार मनामध्येच कसा विस्तारला जातो, हे आपण मला दृष्टांताने समजावून सांगावे.” यावर वसिष्ठांनी शुक्राची कथा सांगितली. भृगुऋषी मंदार पर्वतावर तप करीत असता, त्यांचा बुद्धिमान पुत्र शुक्र त्यांची सेवा करीत असे. ज्ञान व अज्ञानाच्या सीमारेषेवर असलेला तरुण शुक्र वेगवेगळ्या कल्पना करीत आपला वेळ घालवीत असे. एकदा भृगुऋषी समाधिस्थ असता शुक्राची नजर आकाशमार्गे चाललेल्या एका अप्सरेकडे गेली. शुक्र देहाने जरी तिच्या मागून गेला नाही, तरी तो मनाने तिच्यात गुंतला. डोळे मिटून तो मनोराज्यात गढून गेला. तिच्या मागून तो स्वर्गात पोचला, नंदनवनात हिंडला, कल्पवृक्षाखाली बसला, एवढेच काय त्याने इंद्राला जवळून वंदन केले. इंद्रानेही त्याला सन्मानाने वागवून तेथे ठेवून घेतले. तिथे ती अप्सरा त्याला भेटली व दोघांनी अनेक वर्षे तेथे सुखाने वास्तव्य केले. पुढे त्याला आपले पुण्य क्षीण झालेसे वाटले व आता आपण पृथ्वीवर पडणार, या भीतीने त्याचे दिव्य शरीर नष्ट होऊन तो खरेच खाली पडला.
शुक्राचा स्थूल देह नष्ट झाला; पण मरतेसमयीच्या नाना प्रकारच्या वासनांनी अनेक जन्म, अनेक वेगवेगळी शरीरे यांचा अनुभव घेत घेत शेवटी समंगा ऊर्फ महानदीच्या काठी तो मोठ्या समाधानाने तप करीत बसला. भृगूच्याजवळ असलेला शुक्राचा देह आता क्षीण, जर्जर झाला व जमिनीवर कोसळला. समाधीतून जागे झाल्यावर पुत्राचा देह पाहातच भृगू कालावर संतापले. आपल्या पुत्राचे त्या कालाने हरण केले म्हणून ते त्याला शाप देणार, एवढ्यात भगवान कालच प्रकट होऊन म्हणाले,”नेमून दिलेले काम आम्ही केले. शाप देऊन तू आपल्या तपाचा नाश कशाला करतोस? तू समाधीत असता शुक्राचे मन अनेक ठिकाणी आसक्त झाले, अनेक जन्म उपभोगून आता तो समंगातीरावर तप करीत आहे.” मग भृगूने योगदृष्टीने आपल्या पुत्राच्या चरित्राचा विचार केला. कालाची क्षमा मागितली. भूतमात्रांना स्थूल व सूक्ष्म अशी दोन शरीरे असून, ती दोन्ही वस्तुतः मनच होत, हा सिद्धांत त्याला पटला.
भगवान काल व भृगू शुक्राकडे गेले. काळाच्या आज्ञेनुसार शुक्र भानावर येऊन ते तिघेही मंदार पर्वतावर परत आले. मग शुक्राने आपल्या पूर्वीच्या शरीरात प्रवेश केला. प्रथम जन्मातच ज्ञानसंपन्न झालेल्या या तुझ्या तनूला दैत्यांचे गुरुत्व करायचे आहे, महाप्रलयाचे वेळी तू ही तनू कायमची सोड व या प्राक्तनरूपी तनूने तू जीवन्मुक्त होऊन दैत्यगुरू बनून राहा, अशी काळाने शुक्राला आज्ञा केली. जो पुरुष चित्तरहित झाला त्याला इष्ट, अनिष्ट भेदाभेद राहत नाही, हे समजून घेत तो शुक्र परमपदापासून पूर्वकल्पातील आपल्या संकल्पामुळे उत्पन्न झाला. या नंतर शुक्राचार्य दैत्यांचे गुरू होऊन त्यानी वेळोवेळी देवाना त्रस्त करून सोडले .
दैत्य गुरू शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र होत तर ब्रम्हदेव यांचे नातू होत.
गुरू शुक्राचार्य यांना भार्गव असेही म्हटलेले आहे। आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत असलेला शुक्र बिघडला की विवाहसौख्य पार बिघडते. शुक्र हा सौख्याचा तारक ग्रह आहे. तेव्हा खालील जप सांगितले जातो.
हिमकुंद मृणालाभं दैत्याना परम गुरू l
सर्व शास्त्र प्रवक्तारं भार्गवम प्रणमाम्यहं l
आजही गुरू शुक्राचार्याच्या स्थानावर मुहूर्त वेळ-नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता बाराही महिने विवाह सोहळे होतात. पेशव्यांनी वाडय़ाच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्या पूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू, गणपती यांची मंदिरे आहेत. काळ्या गुळगुळीत दगडाचे विष्णू मंदिर प्रसिद्ध आहे, त्याच्या पायथ्याशी पूर्वी गोदावरी नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही पाहावयास मिळतो. दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तरपूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर (त्रंबकेश्वर) येथे गुप्त रूपाने आले असे मानले जात असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे. भगवान शंकर गुप्त रूपाने येथे आले असे मानले जात असल्याने या मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. महाशिवरात्र पर्व काळात येथे मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. शुक्राचार्य मंदिराचा रामानुग्रह ट्रस्टच्या वतीने व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळातही येथे मोठे उत्सव होतात. गुरू शुक्राचार्याची पालखी गंगाभेटीस तसेच दसरा (विजयादशमी) सीमोल्लंघनाच्या वेळी देवी मंदिरात नेण्याचा प्रघात येथे आहे.
कुंभमेळा पर्वात या मंदिरापासून गोदावरी नदी पात्रापर्यंत शोभायात्रा काढली गेली. शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गावर हे बेट कोपरगाव स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे.
ज्यांच्या पत्रिकेत शुक्रबळ नसेल , शुक्र अस्तंगत झाला असेल , विवाह जुळत नसेल, विवाह सौख्य नसेल अशा व्यक्तींनी या गुरू शुक्राचार्य यांच्या स्थानास अवश्य भेट घेऊन मूर्तीस अभिषेक करावा. पौराणिक कथा सांगितली जाते.
सर्व बांधवांनी एकदा तरी अवश्य या दैत्य गुरू , चिरंजीवी शिल्पाचार्य शुक्राचार्य यांचे समाधी मंदिरास भेट देऊन दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
लेखक वि. स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मुळ शुक्राचार्य, कच आणि देवयानी यांच्या जीवनावर आधारित असून कोपरगाव येथे गुरू शुक्राचार्य मंदिर परिसरात या सर्व घडलेल्या प्राचीन घटनांचे घटनास्थळ आजही अस्तित्व दाखवते आहे.
प्रत्यक्ष या मंदिरास भेट द्यावी ….
श्री बाळासाहेब आव्हाड :-अध्यक्ष :- गुरु शुक्राचार्य महाराज कोपरगाव श्री सचिन परदेशी :- मंदिर प्रमुख गुरु शुक्राचार्य महाराज कोपरगाव श्री प्रसाद परहे :- मंदिर उपप्रमुख गुरु शुक्राचार्य महाराज कोपरगाव श्री आदिनाथ गो ढाकणे :- अध्यक्ष :-गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट सदस्य गुरु शुक्राचार्य महाराज कोपरगाव.
प्रभाकर शिंदे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र ९७६४७७६२७७