Breaking
ब्रेकिंग

‘चैत्र पौर्णिमा प्रात:काळ । अंजनीस जाहला बळी बाळ । वानररूप निढाळ । विद्युल्लतेपरि झळकतसे ।।’

0 1 0 5 4 6

मारुति

‘चैत्र पौर्णिमा प्रात:काळ ।
अंजनीस जाहला बळी बाळ ।
वानररूप निढाळ ।
विद्युल्लतेपरि झळकतसे ।।’

 

आज चैत्र पौर्णिमा. मारुतीची जन्मतिथी. मारुति हे बळाचे दैवत आहे. मानसिक व शारीरिकदृष्टया जे सक्षम नसतात त्यांना मारुतीस्तोत्र वाचण्यास सांगितले जाते, त्यामागे शास्त्र हेच आहे की पठण करणाऱ्याला बळ मिळावे. सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेल्या ‘हनुमान चालीसा’ मधील २९ वी चौपाई पुढीलप्रमाणे, ‘चारों जुग परताप तुम्हारा । है परसिद्ध जगत उजियारा ।।’ अर्थात सत्य, त्रेता, द्वापार, व कली या चौघा युगांमध्ये मारुतीचा प्रताप देदीप्यमान आहे. यावरुन असेही एक लक्षात येते की मारुति सत्ययुगापासून कार्यरत आहे. याबाबत अलिकडेच आणखी एक संशोधन असेही आहे, त्रेतायुगात रामजन्माआधी मारुतीचे अस्तित्व होते. वाचण्यात असेही आले की, ७१२९ वर्षपूर्व मारुतीचा जन्म झाला. भारतवर्षातील काही द्वीपांवर विलक्षण वानरजात पूर्वी अस्तित्वात होती. त्या वानरजातीला कपि असे संबोधण्यात येई. (बाली नावाच्या द्वीपावर अद्याप शेपटी असलेली मानवजात आहे) या कपिंचा अर्थात कपिक्षेत्राचा राजा केसरी (कपिराज) व राणी अंजनी यांचा पूत्र म्हणजे मारुति. (हे कपिक्षेत्र म्हणजे आताचा हरियाणामधील कैथल जिल्हा, त्यालाच पूर्वी कपिस्थल म्हणायचे. तो त्याकाळी कपिराज यांच्या अधिपत्याखाली होता.) आणि त्यावरुनच मारुतीचे जन्मस्थळ कैथल मानले जाते. आणखी एका कथेत असे सांगितले जाते की, झारखंड राज्यातील गुमला नावाच्या जिल्ह्यात आंजन गाव आहे. तेथील एका गुहेत अंजनीने मारुतीला जन्म दिला. या आंजनगावात अंजनी रहात असे. आणखी एक मतप्रवाह असादेखील आहे की आपल्या नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राजवळ अंजनेरी नावाचा डोंगर आहे, तेथे अंजनी रहात असे व मारुति तेथे जन्माला आला. गुजरातेत डांग जिल्हयातील आदिवासींच्या मान्यतेनुसार तेथील अंजनपर्वतातील अंजनी गुहेत मारुति जन्माला आला तर असेही सांगितले जाते की, म्हैसूरमधील पंपासरोवर (पंपासर) हम्पीजवळचे अनेगुंदी नावाचे गाव म्हणजे रामायणकालिन किष्किंधा नगरी. येथे मतंग ऋषींचा आश्रम आहे. (हे मतंग म्हणजे रामायणातील शबरीचे गुरू.) या आश्रमात मारुतीचा जन्म झाला असेही म्हणतात. ‘मतंग’ या आदिवासी जमातीशी मारुतीचा संबंध त्यातूनच जोडला जातो. मरुत (वायू) चा पुत्र म्हणून मारुति. सूर्यदेवांना फळ समजून खाण्यास गेला असता वज्राने हनुवटीवर प्रहार झाला म्हणून हनुमान, अंजनीचा मुलगा म्हणून आंजनेय, केसरीचा चिरंजीव म्हणून केसरीनंदन.
मारुतीला ‘हनुमानचालिसा’मध्ये संकरसुवनदेखील म्हटले गेले आहे. बजरंगबली हे तसे पाहता अगदी अलिकडे म्हणण्यात येते. वाल्मिकी रामायणात एक उल्लेख असा आहे की, पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यानंतर दशरथाला अग्नितून जे पायस प्राप्त झाले त्याचा एक भाग भुकेलेल्या घारीने झडप घालून पळवला. पुत्रासाठी अंजनीची तप:श्चर्या सुरु असलेल्या ठिकाणी वायुचा वेग अधिक झाल्याने हे पायस घारीकडून तिच्या ओंजळीत पडले व प्रसाद समजून तिने भक्षण केले असता मारुतीचा जन्म झाला. मारुतीशी वायुदेवाचा संबंध असा लावला जातो. केसरी व अंजनी यांना गतिमान, श्रुतिमान, धृतिमान, केतुमान व मतिमान नावाचे आणखी पुत्र-पुत्रीही होत्या. ते मारुतीचे सहोदर होत. मारुतीला अकरावा रूद्रदेखील म्हणण्यात येते. मारुतीच्या विवाहाबद्दल अनेक प्रवाद आहेत. सूर्यदेवाची पुत्री सुर्वचला ही त्याची पत्नी सांगण्यात येते. विद्यादानासाठी मारुतीला विवाहाचे बंधन असल्याने सूर्यदेवाने सुर्वचलासोबत त्याचे लग्न लावून दिले अशी आख्यायिका आहे. केवळ विवाह लावून, मारुतीला विद्यादान केल्यानंतर सुर्वचलेला पुन्हा आपल्या तेजात सूर्यदेवाने सामावून घेतले. आंध्रप्रदेशातील खम्मम जिल्हयात मारुति व सुर्वचला देवीचे मंदिर आहे. पाताळदेव अहिरावणाचा द्वारपाल असलेला मकरध्वज मारुतीचा पूत्र असल्याचेही अनेक संहितांमध्ये उल्लेख आहेत. पुराणशास्त्र श्रीमद भागवतात वर्णन आल्यानुसार, कलियुगात हनुमानाचा निवास गंधमादन पर्वतावर आहे. कश्यप ऋषींचे तपस्याक्षेत्र असलेला गंधमादन पर्वत सहस्त्रदलकमलासाठी प्रसिद्ध असून अद्यापही ही फुले तेथे मिळतात. या पर्वतावर पांडव मुक्कामी असताना पुजाविधीसाठी सहस्त्रकमलदल आणण्यास गेलेल्या भीमाला मारुतीने दर्शन दिले होते. हिमालयस्थित हा पर्वत कैलासाच्या उत्तरेला असून तो कुबेराच्या राज्यक्षेत्रांपैकी एक आहे. हा पर्वत तिब्बतमध्ये आहे. गंधमादन नावाचा एक पर्वत रामेश्वरमजवळही आहे. लंकेला जाताना समुद्र पार करण्यासाठी याच पर्वतावरून मारुतीने झेप घेतल्याचे सांगितले जाते. तसेच जम्बुद्वीपातील इलावृत्त खंड व भद्राश्व खंडाच्या मधोमध एक गंधमादन पर्वत आहे, तो सुगंधित पुष्पांसाठी प्रसिद्ध आहे, तोच पांडवांनी मुक्काम केलेला पर्वत होय. ओरिसामध्येही एक गंधमादन पर्वत आहे. त्यामुळे भागवतात उल्लेख केलेला गंधमादन कोणता याबाबतचे रहस्य उलगडत नाही.

लंकाविजयानंतर अयोध्येला आले असता विभिषण, सुग्रीव, अंगद यांना भेटवस्तू देत असताना मारुतीला काय देऊ असे श्रीरामांनी विचारले. तेव्हा ‘यावद् रामकथा वीर चरिष्यति महीतले । तावच्छरीरे वत्स्युन्तु प्राणामम न संशय:।।’ अर्थात रामकथा जोपर्यंत प्रचलित आहे तोपर्यंत या शरीरात प्राण असू दे असे मारुतीने सांगितले. श्रीरामांनाही आशीर्वाद देत म्हटले की, ‘एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशय:। चरिष्यति कथा यावदेषा लोके च मामिका तावत् ते भविता कीर्ति: शरीरे प्यवस्तथा। लोकाहि यावत्स्थास्यन्ति तावत् स्थास्यन्ति में कथा।’ अर्थात हे कपिश्रेष्ठ, असेच होईल. त्यामुळे कलियुगात ज्या ठिकाणी भगवान श्रीरामाची कथा सुरु असते तेथे गुप्तरूपात मारुति नि:संशय विराजमान असतात.

डॉ.प्रशांत दामोदर भरवीरकर, नाशिक 9503677740

संदर्भ :
1. सुन्दरकाण्ड वा. रा. ५६, २६
2. वाल्मिकी रामायण, किष्किंधा कांड, ६६/८, ४०
3. वाल्मिकी रामायण, उत्तर कांड, ३५/१४-३४, ३६/१-२७
4. वाल्मिकी रामायण, उत्तर कांड, ३६/२८-३७
5. शिव पुराण, ७/३३-४३
6. वाल्मिकी रामायण, सुंदर कांड, ३/१९-५१
7. वाल्मिकी रामायण, सुंदर कांड, सर्ग ४८-५७
8. वाल्मिकी रामायण, युद्ध कांड ७३/६८-७४, ७४
9. पउम चरित, १९, ४९-५०/ ५२, ५५

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 5 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे