Breaking
महाराष्ट्र

सुखना नदी अतिक्रमण , वाळू उपसा व प्रदुषणाच्या विळख्यात

व्यापक जनजागृती ची गरज

0 0 4 7 8 9

सुखना नदी अतिक्रमण , वाळू उपसा व प्रदुषणाच्या विळख्यात…

व्यापक जनजागृतीची गरज…
सुखना नदी नामशेष होण्याच्या मार्गावर..
शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष..

सुखनाकाठ हे माझे अत्यंत आवडते ठिकाण. याच सुखना नदीत मी कोणे एके काळी खूप खेळलो बागडलो. लहानाचा मोठा झालो. सुखनेच्या पाण्यात दिवस दिवस पोहलो. नदीपात्रात तासनतास बसून जीवनाचं नी जगण्याचं गणित मांडले. सुखना ही छत्रपती संभाजी नगरच्या जवळच असलेल्या चौका सारोळ्या च्या डोंगरातील कोलठाण शिवारातून ऊगम पावते. पुढे ती अंबड तालुक्यातील साडेसावंगी येथे दुधनाला मिळते. याच परिसरात सुखना – दुधना – लहुकी असा त्रिवेणी संगम आहे. पुढे दुधना नदी ही पुर्णा ला मिळते. अशी ही सुखना नदी पळशी, मांडकी, नारेगाव आदी गावच्या शिवारातून वाहात येत चिकलठाणा, झाल्डा, आजगाव निपाणी , डायगव्हाण, पिंप्री राजा , भालगाव , गारखेडा, घारेगाव ,कोळघर, वाकुळणी, माहेर भायगाव,देशगव्हाण, चिकणगाव, बाजार वाहेगाव, नानेगाव, बदापूर, आवा आंतरवाला आणि साडेसांवगी असा तिचा प्रवास आहे. याच सुखना नदीवर गारखेडा गावाजवळ सुखना मध्यम प्रकल्प आहे. गारखेड्याचे धरण असेही त्यास संबोधले जाते. १९ ९० नंतर पर्जन्यमान कमी कमी होत जावून प्रचंड जंगलतोड झाल्यामुळे आणि सततच्या दुस्काळ व अवर्षणामुळे सुखना नदी ही उजाड झाली. एकेकाळी मालिक अंबरने या सुखना नदीचा उपयोग छ. संभाजी नगर वासियांच्या तहान भागविण्यासाठी केला गेला होता. एवढी ही नदी स्वच्छ होती. महानगरातील सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी तसेच छ. संभाजी नगर व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील घनकचरा व सांडपाणी या नदी पात्रात सोडले गेल्यामुळे ही सुखना नदी प्रचंड प्रदुषित झाली आहे. तिला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज सुखना नदी ही गलिच्छ होवून त्यामुळे लोकांचे जनारोग्य प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. चिकलठाणा, येथे नदीपात्रात प्रचंड घनकचरा व सांडपाणी सोडले जाते. येता जाता दुर्गंधी सुटते. झाल्टा शिवारात या नदीपात्रात गलिच्छ वास येतो. तसेच निपाणी, भालगाव परिसरात ही सुखना नदी पात्र मैलायुक्त ड्रेनेजच्या पाण्यामुळे प्रचंड प्रदुषित झाली आहे. चिकलठाणा,झाल्टा, निपाणी, भालगाव या गावातील लोकांना सर्वांत जास्त या प्रदूषित पाण्याचा फटका बसत आहे. या संदर्भात मी अनेकदा या गावास व परिसरास भेटी देवून प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे. मात्र लोकप्रतिनीधी च्या व शासनाच्या उदासिन धोरणामुळे कुणीही साधी दखलही घेत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रदूषित पाण्यामुळे शेती व पिकावर परिणाम होऊन शेती कंपन्याच्या केमिकल युक्त पाण्यामुळे नापिक झाली आहे. तसेच जनावरे व नागरिकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते. या संदर्भात सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समितीची स्थापना करून काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सुखना नदीची विदारकता व सद्यःस्थिती वेळोवेगी निवेदने देवून शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मनपा, जि.प., जिल्हाधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, तसेच आमदार, मंत्री , विभागीय आयुक्त यांना वेळेवेळी भेटून तसेच प्रत्यक्षा प्रत्यक्ष निवेदने देवून सुखना नदीची समस्या मांडली आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली नसल्याचे जाणवते.मा. विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे समिती सोबत झाली. मात्र त्यानंतर काहीही झाले नाही. लोकप्रतिनीधी यांनीही या जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांशी निगडित विषयांकडे गांभीर्य पूर्वक लक्ष दिले नाही. परिणामी सुखना नदी ही हे सर्व भोगत आहे. विविध माध्यमातून हा विषय आम्ही समाजा पर्यंत घेवून गेलो. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नदीकाठी व परिसरात अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. लोकांना नदीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. सुखना नदीची चर्चा राज्यभर झाली मात्र उदासीन शासन व प्रशासन आणि बघ्याची भूमिका घेणारे लोक यामुळे हा प्रश्न सुटत नाही. सुखना नदीची महत्वाची समस्या म्हणजे अतिक्रमण, प्रदुषण आणि वाळू उपसा, या तीन गोष्टीवर प्राथमिक स्वरूपात काम होणे आवश्यक आहे. सुखना नदी पात्रात ठिक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. नदी पात्रात भराव टाकून नदीकाठी वस्ती तयार झाली. पावसाळ्यात नदीचे पाणी मानवी वसाहतीत शिरते. त्यामुळे खूप मोठी हानी होते. अनेकांना जीव गमवावे लागतात. सुखना नदीतील जलप्रदूषण हा नित्याचाच विषय झाला आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही. अवैध्य वाळू उपसा ही सर्वांत मोठी सुखनाची समस्या असून या वाळू उपशामुळे नदीपात्र अस्तिवहीन होवून चिवळ झाले आहे. अतिरेकी वाळू उपशामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह व पात्र धोक्यात आल्यामुळे जमिन फाकते तसेच सुखना नदी वरील कोल्हापुरी बंधारे फुटले. बाजूची जमिन वाहून गेली खरडून गेली. वाकुळणी, बदापूर शिवारात या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहे. वेळेवेळी निवेदने देवून आवाज उठवून अजुनही बंधारा दुरुस्ती व शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. येत्या पावसाळ्या पूर्वी हे काम झाले नाही तर शेतक ऱ्यांचे खूप नुकसान होईल. अनेक नेते व अधिकारी यांनी आश्वासने दिली मात्र काम सुरू करण्यास प्रयत्न केले नाही. सुखना नदी पात्रात ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे आहे. काही फुटले तर बहुतांश बंधाऱ्यांना डागडुजी नाही. दरवाजे नाही. त्यामुळे पाणी थांबत नाही. प्रचंड मोठी गुंतवणूक करून शासनाने हे बंधारे बांधले मात्र त्याकडे ना ग्रामपंचायत लक्ष देते ना शासन. कोल्हापुरी बंधारे म्हणजे फक्त शोभेच्या वास्तू झाल्या आहेत. त्याच्या डागडुजी व दरवाजे टाकण्यासाठी कोणतीही सक्षम व्यवस्था नाही. त्यामुळे शासनाचा हा पैसा व्यर्थ ठरला पाण्यात गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते. सुखना नदी काढची ही गावे सीमेवरची असल्यामुळे शासन व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होते. कोणत्याही प्रभावी विकास योजना नसल्यामुळे ही गावे अजून ही विकासा पासून कोसो दूर आहेत. संघटन व व्यापक जनजागृती चा अभाव आणि कमालीचे दुर्लक्ष आदीमुळे सुखना नदीकाठच्या गावांना मरण यातना व नरक यातना भोगाव्या लागत आहेत. सुखना नदीवरील ठिकठिकाणी असलेले छोटे मोठे पुल खचले काहीचे कठडे तुटले त्यामुळे अपघात होऊ लागतात. याकडेही कुणाचेच लक्ष नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पाण्याचा अभाव आदीमुळे सुखना काठची गावे कायम वंचित आहेत. सुखना नदीच्या खालच्या भागात बंधारे होण्याची गरज आहे. या परिसरात पाणी , नदी व पर्यावरण विषयक जागृती झाली नाही तर तसेच व्यापक जन आंदोलन ऊभे राहिले नाही तर सुखना मरणावस्थेत जावून अस्तित्व हीन होईल. सुखना नदीच्या समस्ये बाबत सातत्याने सुखना बचाओ जनआंदोलन संघर्ष . समितीच्या माध्यमातून लोक लढा उभा करण्याचा प्रयत्न होत आहे . या प्रयत्नाला जनरेटा व शासनाची मदत आणि नेत्यांचे आशिर्वाद मिळाले तर या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहाणार नाही. त्यासाठी गरज आहे ती सकारात्मकतेची . चांगल्या आचार विचारांची. सुखना नदीही प्रदुषण, अतिक्रमण, व वाळू उपसा यांच्या केचित सापडली आहे. गरज आहे सुखना नदीच्या पुनरुज्जीवनाचे व तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचे.

– डॉ. शिवाजी हुसे
संस्थापक अध्यक्ष, सुखना बचाओ जन आंदोलन
संघर्ष समिती, छत्रपती संभाजीनगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 8 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे