आज ऋषीपंचमी. ज्यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या ज्येष्ठ, वृद्ध आणि जाणकार मार्गदर्शकांना स्मरण करण्याचा दिवस.
सप्तर्षी
आज ऋषीपंचमी. ज्यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या ज्येष्ठ, वृद्ध आणि जाणकार मार्गदर्शकांना स्मरण करण्याचा दिवस.
सप्तर्षी म्हणजे हिंदू पौराणिक कथांमधील सात महान ऋषींचा समूह. वेदात आणि इतर हिंदू ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मन्वंतरात सप्तर्षी वेगळे असतात आणि त्यांचा उद्देश मानवजातीला मार्गदर्शन करणे हा असतो. *सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू असून त्यात वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत.* पुराणात मानलेल्या चौदा मन्वंतरांचे एकूण अठ्ठयाण्णव ऋषी होतात. यापैकी गौतम ऋषी यांचे वास्तव्यस्थान त्र्यंबकेश्वर आहे. नाशिकमध्ये दक्षिणवाहिनी होणारी गोदावरी नदी ही गौतमी नावाने ओळखली जाते. गौतम ऋषींनी तिला कैलासावरून, त्र्यंबकेश्वरी आणले. ब्रह्मगिरीवर तिचा उगम आहे. *आपण किती भाग्यवंत आहोत, सप्तर्षींपैकी एक असलेल्या महान गौतम ऋषींच्या सान्निध्यात आपण राहतो.*
या ऋषींचा संबंध आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षी नावाच्या ताऱ्यांच्या समूहाशी आहे. (Ursa Major) हा या ऋषींचे प्रतिनिधित्व करतो. या ताऱ्यांमुळे आकाशगंगा पाहणाऱ्यांना उत्तर दिशा आणि ध्रुव ताऱ्याचे स्थान समजण्यास मदत होते. आकाशातील ‘बिग डिपर’ हा तो तारकासमूह आहे.
मानवजातीला मार्गदर्शन करणे हे सप्तर्षींचे कार्य आहे. सप्तर्षींनी वेद, धर्म, समाज, ज्ञान, विज्ञान आणि खगोलशास्त्र यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. *महाभारतात सप्तर्षींना ‘ दिशांचे स्वामी ’ असे म्हटले असून प्रत्येक दिशेच्या सप्तर्षींची नामावलीही दिली आहे.* भारतीय ऋषी-मुनींनी या पृथ्वीवर धर्म, समाज, शहरे, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, वास्तू, योग इत्यादींच्या ज्ञानाचा प्रसार केला. सप्तर्षींनी फक्त मनुष्यांचाच विचार केला नाही तर प्राणी, पक्षी, समुद्र, नदी, पर्वत आणि झाडे या सर्वांचा विचार केला आणि सर्वांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्य केले
भाद्रपद शुद्ध पंचमी यादिवशी स्त्रिया करीत असलेल्या ऋषीपंचमीस सध्याच्या वैवस्वत मन्वंतराच्या सात ऋषींची पूजा करतात. श्रावणी वगैरे कित्येक धर्मकृत्यांत सप्तर्षींची पूजा करतात. काही ठिकाणी विवाहविधीच्या प्रसंगी वधू-वरांना वशिष्ठ-पत्नी अरूंधती हिचे दर्शन घ्यावयास लावतात. वशिष्ठ ताऱ्याजवळच अरुंधती तारा आहे. तो सामान्य नजरेला दिसत नाही, आपले ज्येष्ठ म्हणत, ज्यांना अरुंधती दिसतो, ते प्रखर नजरेचे असतात.
भगवंताने सप्तर्षींची निर्मिती या सृष्टीचे संतुलन ठेवण्यासाठी केली. धर्म आणि मर्यादा यांचे रक्षण करणे, विश्वातील सर्व कार्य योग्य पद्धतीने होण्याचे कार्य भगवंताने त्यांच्याकडे सोपवले आहे. सप्तर्षी त्यांच्या तपश्चर्येने विश्वात सुख-शांती कायम ठेवतात. प्रस्थापित करतात. *‘सप्तर्षी’ हे केवळ ऋषि नसून ते महर्षि आहेत.* महर्षि म्हणजे श्रेष्ठ ऋषि. हे सात महर्षी स्वतः अध्ययन करणे, करवून घेणे, यज्ञ करणे, करवून घेणे, दान घेणे आणि दान देणे, ही सहा कर्मे सतत करत असतात.
आपण सप्तर्षींचे ऋणी असले पाहिजे कारण आपण त्यांचे वंशज आहोत. कोणत्याही धार्मिक विधीत आपण जो गोत्राचा उल्लेख करतो तो म्हणजे हे ऋषी. आज ऋषीपंचमीला त्यांचे स्मरण करूया व कृतज्ञता भाव ठेवूया. विश्वचैतन्य शक्तीला वंदन.
©
डॉ.प्रशांत भरवीरकर, नाशिक
9503677740





