विषय :-धर्मांधभक्त, अक्रोडा एवढ्या मेंदूचे राजकीय नेते, गर्विष्ठ व पर्यावरणाचे ज्ञान नसलेले राज्य आणि केंद्र सरकार मधील सनदी अधिकारी आणि भूमाफिया/ठेकेदार यांचे तावडीतून अंजनेरी ब्रह्मगिरी हरिहर सह नाशिक जिल्ह्यातील किल्ले वाचवण्याबाबत.

प्रती,
माननीय मुख्य न्यायाधीश , बॉम्बे उच्च न्यायालय, मुंबई
माननीय श्री प्रवीणजी गेडाम, महसूल आयुक्त, नाशिक
माननीय श्री जलजजी शर्मा जिल्हाधिकारी नाशिक
माननीय श्री मल्लिकार्जुनजी , मुख्य वन संरक्षक ,नाशिक
माननीय श्री सिद्धेशजी सावर्डेकर उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम
माननीय श्री उमेश जी वावरे, उपवनसंरक्षक नाशिक पूर्व
विषय :-धर्मांधभक्त, अक्रोडा एवढ्या मेंदूचे राजकीय नेते, गर्विष्ठ व पर्यावरणाचे ज्ञान नसलेले राज्य आणि केंद्र सरकार मधील सनदी अधिकारी आणि भूमाफिया/ठेकेदार यांचे तावडीतून अंजनेरी ब्रह्मगिरी हरिहर सह नाशिक जिल्ह्यातील किल्ले वाचवण्याबाबत.
महोदय,
सध्या संपूर्ण देशात जनतेमध्ये अचानक आपआपल्या धर्माविषयी प्रेम जागृत झालेले असून आपापल्या धर्माच्या धार्मिक ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागलेल्या आहेत. पुराणकाळापासून हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक स्थळ हे दुर्गम ठिकाणीच असलेले दिसून येते. जर तुम्हाला देव हवा असेल तर कष्ट घ्या हा संदेश त्यातून मिळतो.
सध्या उत्तरेतील दुर्गम गावांना आणि पर्यटनक्षेत्रांना जोडणाऱ्या पर्वतमाला श्रृंखलेतील रोपवे महाराष्ट्रात विविध किल्ल्यावर आणण्याचे वेड सुरू झालेले असून वर उल्लेखित विषयांमधील चार प्रकारचे प्राणी ज्यांना आपण यापुढे चांडाळ चौकडी म्हणु यांनी पद्धतशीरपणे महाराष्ट्रातील किल्ले नामशेष करायचे ठरवल्याचे दिसून येत आहे.
महोदय ,महाराष्ट्रातील किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता असून या किल्ल्यांमुळेच महाराष्ट्रधर्म टिकून राहिला ज्याने पुढे संपूर्ण भारताला स्वातंत्र्याची उर्मी देऊन भारताचे अस्तित्व कायम राखण्यास मदत केली. जे राष्ट्र आपले इतिहास विसरते त्या राष्ट्राला भविष्य काळ नसतो या उक्तीप्रमाणे चांडाळचौकडीने किल्ले नामशेष करून त्याजोगे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मिटवून जनतेस मानसिक गुलाम करण्याचे ठरवले आहे असे आता जाणवु लागलेले आहे.
दुर्दैवाने यातील बऱ्याच किल्ल्यांवरती धार्मिक स्थळे असून बऱ्याच नद्या नाले ओहोळ यांची उगमस्थाने ही किल्ल्यांवर आढळून येतात. नाशिक मधील अंजनेरी ते ब्रह्मगिरी हरिहर चंद्रेश्वर इंद्रायणी या किल्ल्यांवरती लवकरच रोपवे येणार आहेत असे समजते. वर उल्लेखल्याप्रमाणे या रोपवेंना धार्मिक रंग देऊन वर्दळ वाढवायचे प्रयत्न दिसतात. मात्र किल्ले हे दुर्गम असतातच व त्यावरील धार्मिक स्थळे त्याहून जास्तीत दुर्गम असतात व यांना भेट देण्यासाठी कष्ट घेतले गेलेच पाहिजेत याचा विसर सर्वांनाच पडलेला आहे असे जाणवते.
अंजनेरी किल्ला पश्चिम घाटातील बायो डायव्हर्सिटी हॉटस्पॉट मध्ये येत असून दुर्मिळ वनस्पती ,भारतातील पंचवीस टक्के गिधाडांचे आश्रयस्थान , वालदेवी नदीचा उगम व जैवविविधतेचे भांडार म्हणून प्रसिद्ध आहे .असाच काहीच प्रकार ब्रह्मगिरी या पर्वताबाबत असून गोदावरी, अहिल्या, निलगंगा ,बाणगंगा आणि वैतरणा या नद्यांचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वतावर आढळून येते. तर हरिहर हा अतिदुर्गम भागातील किल्ला असून याचे सभोवताली अतिशय दाट वन आढळून येते. चंद्राई उर्फ चंद्रेश्वर आणि दुर्गम भागातील इंद्राई किंवा इंद्रायणी हे केलेले हे किल्ले हे याच प्रकारात मोडत आहेत.
कधीकाळी संपूर्णपणे वनविभागाच्या ताब्यात असलेला सप्तशृंगी गड हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कचराकुंडी बनलेला आहे व हाच प्रकार वर्दळ वाढल्याने व रोपवेमुळे वरील किल्ल्यांवर व धार्मिक स्थळी होणार आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही.
वर उल्लेखित चांडाळचौकडीने महाराष्ट्रातील पर्यावरणाचा संपूर्णपणे नाश करण्याचे ठरवलेले असल्याकारणाने सदर किल्ल्यांवरती रोपवे आणण्याचे प्रस्ताव दिलेले आहेत. जेणेकरून किल्ल्यांवरती भयंकर प्रमाणात वर्दळ वाढून तेथील वनस्पती, वृक्षराजी कायमस्वरूपी संपून नद्यांची उगमस्थाने आटतील व पर्यायाने नद्या संपुष्टात येऊन जनता ही भिकेला लागेल अथवा पाणी विकत घेण्यासाठी बाध्य होईल असा एकंदरीत डाव दिसतो. एकंदरीतच किल्ल्यांचे व पर्यावरणाचे महत्त्व या चांडाळचौकडीच्या हिशोबाने शून्य आहे असे जाणवते.
यातच अंजनेरीसारख्या किल्ल्यांवरती नवीन मंदिर, आश्रम शाळा ,धर्मशाळा ,गोशाळा वगैरे बांधण्यासाठी 20 -30 हेक्टर जागेच्या मागण्या, अंजनेरीवर जाण्यासाठी रस्ता अंजनेरीशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेल्या व्यक्ती आणि संस्थांकडून केल्या जात आहेत. हा सर्व प्रकार येणारा कुंभमेळा आणि धर्माचे वाढते महत्त्व यातून आर्थिक संधी साधण्यासाठीच आहे हे नाक न पुसता येणाऱ्या लहान मुलासही ओळखू येत आहे. अंजनेरी हा संवर्धन राखीव असतानाही अंजनेरीवर दोन खाजगी जागा दिसून येत असून गावातील वृद्धांशी बोलणं झाल्यानुसार शेतीसाठी वाटप राखीव वनाच्या जागाही भूमाफीयांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलातकरित्या समजते. तर तलाठी दप्तरातून महत्त्वाची कागद गायब झाल्याचे ही कळते. महोदय आपण आपल्या अधिकारात अंजनेरी किल्ल्यावरील व अंजनेरी मेटघेरी वरील (गाव सोडून) सर्व जागा ताबडतोब वनविभागाच्या ताब्यात राखीव वन म्हणून घ्याव्यात ही विनंती मी आपणास करत आहे.
या सर्व किल्ल्यांना, डोंगरांना काळसर्पाप्रमाणे वेढा घालून बसलेले फार्म हाऊस ,रिसॉर्ट विक्री करणारे भूमाफिया जे सातत्याने पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बरबाद करत आहेत व जंगले झाडे नष्ट करत आहेत त्याचप्रमाणे कुरणे जी जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत त्यांनाही नष्ट करत आहे यांनाही त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे बनलेले आहे. किंबहुना रोपवे या भूमाफयांसाठीच तर येत नाही येत ना ? हा प्रश्न आहे आता सर्वसामान्य पडू लागलेला आहे.
महोदय, अत्यंत अल्पबुद्धीने केले जाणारे रोपवेचे उदात्तीकरण येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी नरकयातना देणाऱ्या ठरणार आहेत. राष्ट्राला प्रगतीकडे नेण्याच्या नादामध्ये आपण पर्यावरणाचा संपूर्णपणे सत्यानाश करून राष्ट्राला झपाट्याने अधोगतीकडे नेत आहोत हे राज्य आणि केंद्र शासनास समजत नाही का? हा फार मोठा प्रश्न या सर्व संबंधाने उपस्थित होत आहे. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीलाच दुनिया समजणाऱ्या अल्पबुद्धी व्यक्तींना पर्यावरण प्रेमींनी विचारलेले हे प्रश्न म्हणजे राष्ट्रद्रोह वाटतो हे दुर्दैव पण सत्य आहे.
आमचे स्थानिक सर्वपक्षीय राजकीय नेते हे याविषयी कोणत्याही प्रकारे विरोध करण्यास अथवा बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे विरोध न करणार्यांसोबतच या विषयावर न बोलणारे राजकीय नेते हे पण महाराष्ट्रद्रोही आहेत असे आम्ही समजून चुकलेलो आहोत.
जनतेलाच विरोधी पक्षात बसवल्याचा भास या सर्व मोठ्या प्रकल्पाच्या उदात्तीकरणामुळे जनतेस होऊ लागलेला आहे. शासन हे जनतेसाठी असते हा संविधानाचा सिद्धांत लोप पावत असून जनता ही चांडाळ चौकडीची गुलाम असली पाहिजे असा नवीन सिद्धांत जन्मास येऊ लागल्याचे दिसत आहे.
निसर्ग हाच खरा हिंदू धर्म आहे आणि किल्ले होते म्हणूनच हिंदू धर्म टिकला हे या चांडाळचौकडीस टक्केवारीच्या आणि धार्मिक उन्मादाच्या गणितात गुंतल्याने कळणार नाही हे तेवढेच सत्य आहे.
महोदय, या पत्राद्वारे फक्त नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर येणाऱ्या रोपवेला नद्या,जैवविविधता, पर्यावरण ,इतिहास आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी विरोध राहील या हे या पत्राद्वारे मी आपणास सांगू इच्छितो.
संविधानाने दिलेल्या नागरिकांच्या अधिकारानुसार कलम 21, 49, 51 A(g) नुसार पर्यावरण, वृक्षराजी वाचवणे व नैसर्गिक व शुद्ध हवा व पाणी मिळणे हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे व त्याची जाणीव ठेवत हे पत्र मी आपणास देत आहे.
आपला नम्र,
अंबरीष शिवाजी मोरे