Breaking
ब्रेकिंग

जो खुद को जानता है वो ही मुझे पहचानता है : श्री शंकर महाराज

0 1 0 3 3 0

 ।। श्री स्वामी समर्थ ।।

जो खुद को जानता है वो ही मुझे पहचानता है : श्री शंकर महाराज

आज कार्तिक शुद्ध अष्टमी (दुर्गाष्टमी) श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अंतरंग शिष्य श्री शंकर बाबा यांचा प्रकट दिवस. अनेकांना श्री स्वामी व शंकर बाबांच्या भेटीची वस्तुस्थिती माहीत नाही. आज प्रकटदिनानिमित्ताने हा विषय घेऊ. शंकर बाबांचा जन्मकाळाविषयी बराच वाद आहे. मात्र त्यांच्या बालपणाविषयी अत्यंत रंजक कथा आहेत. सटाणाजवळील अंतापूर हे बाबांचे गाव, येथपर्यंत सर्वांना मान्य आहे. बाबा अजन्मा होते का, जंगलात वाघांच्या बछड्यांच्या गराड्यात सापडलेले बालक का, त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण की चिमणाजी, त्यांचे आडनाव अंतापूरकर की उपासनी? असे अनेक वादविवाद आहेत. सामान्यपणे संत महात्म्यांच्या आयुष्याबाबत जे सर्व वादविवाद असतात, ते बाबांच्या बाबतही आहेत. याबाबत संपूर्ण जीवनभरात बाबांनी कधीही अवाक्षरही काढले नाही. त्यांनी केलेली एक स्वाक्षरी कालांतराने पुढे आली आहे. त्यातही खाडाखोड आहे. बाबा नगरला वास्तव्यास असताना, त्यांचे भक्त श्री. दत्तात्रय गणेश अभ्यंकर (अण्णा) यांनी मनीऑर्डर पाठवली ती पोस्ट मास्तरकडून स्वीकारताना बाबांनी स्वाक्षरी केली होती. त्यावर शंकर महाराज असे धडधडीत नाव बाबांनी लिहिले. (ही स्वाक्षरी आजही आपल्याला डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या सौजन्याने, भौतिक शास्त्र विभाग, विज्ञान संस्था मुंबई इथे पहावयास मिळेल.) बाबांच्या नावाची तेवढीच एक खूण मिळते. बाबा लहान असताना तमाशाच्या फडात काम करायचे. भूमिका हुबेहूब वटवणे हे बाबांचे आवडते काम. एकदा चिलिया बाळाचा वग सुरू असताना बाबा इतके आवेशात आले की त्यांनी तलवारीने खरोखरच चिलिया बाळाची भूमिका करणाऱ्या मुलाचे मुंडके छाटून टाकले. रक्ताचा सडा पडला, सगळेजण गर्भगळीत झाले. बाबांनाही समजेना, तितक्यात तेथे त्रिशूल हाती घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्राकट्यीकरण झाले आणि महाराजांनी हत्या झालेल्या मुलाला लिलया उठवले. हे पाहण्यासाठी बाबा तेथे थांबलेच नाही, त्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. बाबा पुढे व स्वामी मागे असा हा खेळ बराच वेळ चालल्यानंतर स्वामींनी त्यांना थांबवले व परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगत ‘घाबरू नको’ असे सांगितले. बाबा शांत झाले तेव्हा महाराजांनी त्यांना स्पर्श केला. हीच ती स्पर्शदीक्षा. बाबा हे श्री स्वामींचे अंतरंग शिष्य झाले. बाबांच्या व स्वामींच्या संपूर्ण चरित्रांमध्ये कोठेही त्यांच्या भेटीचा याशिवाय उल्लेख नाही. त्यांचे दोघांचे सूत्र एकमेकांच्या अंतरंगातून चालायचे. बाबांनी आपल्या सर्व भक्तांना श्री स्वामींचे नाम घेण्याची सूचना केली. बाबा श्री स्वामींना ‘मालक’ म्हणून हाक मारत. (प्रस्तूत लेखकाला एकदा श्री स्वामींनी दृष्टान्तात त्यांच्याबाबत ‘वालिद’ हा शब्द सांगितला होता. तो विषय पुन्हा कधीतरी घेऊया) बाबांची जन्मतिथी कार्तिक शुद्ध अष्टमी सांगितली जाते. पहाटेच्या वेळी सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात त्यांचे प्राकट्य झाले असे मानले जाते. त्यावरून अनेक वादही आहेत. बाबा म्हणत, ‘कैरी कैरी पत्ते के अंदर छुपेगी कितने दिन, एक दिन तो बाहर आयेगी’ त्याप्रमाणे योग्य वेळ येताच बाबांबाबतची सर्व रहस्ये आपोआपच बाहेर येतील अर्थात ती न आली तरी बाबा तो बाबा है. कर्नाटकातील त्यांच्या भागवत नावाच्या भक्ताने बाबांचे चरित्र लिहिले, सत्यनारायणाची पूजा ठेवली व बाबांना बोलावले. बाबांनी काय करावे त्यांनी चरित्राची सारी पाने फाडली व त्यात प्रत्येकाला प्रसाद बांधून दिली. भागवत नाराज झाले तेव्हा बाबा म्हणाले होते… ‘दासबोध, ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहा’ श्री शंकर महाराज हे रोखठोक होते. त्यांनी कधीही कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. ते खऱ्या अर्थाने अवलिया होते. अंतापुरहून निघाल्यावर बाबा बराच काळ नाशिकला गोदावरीच्या काठावर बसायचे. येथे वस्त्रांतर गृहाशेजारच्या श्रीदत्त मंदिरात ते बसायचे. त्यानंतर काही दिवसांनी ते हिमालयाकडे निघून गेले. बाबांना भारतवर्षात अनेक नावांनी ओळखले जाते. सातपुडा परिसरात त्यांना सुपड्या बाबा, काशी विश्वेश्वरला खिचडी बाबा, खान्देशात गौरीशंकर, दक्षिणेत गुरूदेव, मध्यभारतात लहरीबाबा, अरबस्थानात नूर महंमद खान, तर इस्लाममध्ये रहिमबाबा याशिवायही त्यांना अनेक नावांनी ओळखण्यात येते. या प्रत्येक नावाचा त्या त्या स्थानात वेगळा महिमा आहे. बाबांना कांदाभजी, मुगदाळीची खिचडी अत्यंत प्रिय होती. चारमिनार हा बाबांचा आवडता ब्रँड. सिगारेटच्या धुरातून बाबा विश्वाला गवसणी घालायचे. बाबा त्र्यंबकेश्वरी नेहमी येत. रामचंद्र अकोलकर हे बाबांचे शिष्य. तेथे बाबांची गादी आजही आहे. बाबा जेथे बसायचे ती खोली अकोलकर यांनी आजही त्याच स्थितीत, पूजनीय ठेवली आहे. श्री स्वामींच्या चरित्र अभ्यासिका नम्रता भट (भांडूप पूर्व) यांच्या श्री स्वामी समर्थ गौरव गाथामध्ये बाबांबद्दल, एका असाध्य आजारातून ते बाहेर आले आणि त्यांच्या अवलियापणामुळे प्रसिद्धी पावले असा उल्लेख आला आहे. ‘लेखणी माझ्या हाती’ हे बाबांचे वचन अत्यंत प्रसिद्ध आहे. ‘जो खुद को जानता है वो ही मुझे पहचानता है’ असेदेखील बाबा नेहमी म्हणायचे. त्यांनी कोणताही पंथ स्थापन केला नाही की अनुयायी निर्माण केले नाहीत. बाबांचे काही भक्त प्रसिद्धीस पावले. डॉ. धनेश्वर, बाबुराव रूद्रकर, ज्ञाननाथजी रानडे, प्रधान, पेंटरकाका हे त्यापैकी काही प्रतिनिधिक.
आज बाबांचा प्रकटदिन. वाघांच्या सहवासात। बाळ प्रकटले रानात। चिमणाजीला दृष्टान्त। देऊनी स्वगृही आलात।। अशी ओवी शंकरगीतेत आहे. ओंकारनाथ भस्मे यांच्या सांगण्यावरून भगवंत अघोरशास्त्री यांनी शंकरगीता सिद्ध केली आहे. ती प्रमाण मानून भक्तांची वाटचाल सुरू आहे.
पुणे, धनकवडी, पद्मावती येथे २६ एप्रिल १९४७ रोजी बाबांनी समाधी घेतली. बाबा आज चैतन्यअवस्थेत असून त्यांचे कार्य तितक्याच जोमाने आजही सुरू आहे. आज कलियुगात बाबा अधिक वेगाने कार्यरत आहे, तुम्ही फक्त एक करा, जो खुद को जानता है, वो ही मुझे पहचानता है। आपल्याला, स्व ला ओळखायचे आहे, म्हणजे बाबा कोण आहेत हे आपल्या लक्षात येईल.

-डॉ. प्रशांत दामोदर भरवीरकर
(कलर्स मराठी चॅनलवरील ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिका संशोधक व कथालेखक)
9503677740

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे