पीओपीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कसे कराल
दैनिक समाचार मधील स्तंभलेख
पीओपीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कसे कराल
कालपासून आपल्याकडे गणेशोत्सव मंगलमय वातावरणात सुरू झाला. गणेशोत्सव अवघ्या मराठी मनाचा मानबिंदू. मराठी माणूस मग तो महाराष्ट्रात असो दिल्लीत असो किंवा अमेरिकेत असो, गणेशोत्सव म्हटले की तो उल्हासित होणारच. गणेशोत्सव हा आपल्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू आहे. जशी जशी एका बाजूला उत्सवाची व्याप्ती वाढत चालली, तसतशी दुसऱ्या बाजूला उत्साहामुळे निर्माण होणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक व पर्यावरणाच्या समस्यांची व्याप्ती वाढत चालली.
आपल्याकडे बहुतांश गणेश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पाॅप यापासून बनवलेल्या असतात. या मूर्ती वजनाने हलक्या, किमतीत कमी, टिकाऊ व दिसावयास सुबक असतात. सहाजिकच या मूर्ती घेण्याकडे ग्राहकांच्या कल असतो. मात्र या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये लवकर विघटन होत नाही व त्या पाणी साठ्याच्या तळाशी वर्षानुवर्षे राहू शकतात. शिवाय ते पाण्यामध्ये मानवी आरोग्यास घातक व पाण्यामधील जीवसृष्टीला घातक असे रसायन सोडू शकतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला जो रंग लावला जातो तो रासायनिक घटकांपासून बनवलेला असतो. सहाजिकच या मूर्तीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते.
शाडूची माती हा त्याच्यावरील तात्पुरता उपाय आहे. शाडु मातीची मूर्ती वजनाने हलकी व किमतीतही थोड्या जास्त असतात. या मूर्ती जास्त सुबकही नसतात. भंग पावण्याची शक्यता पण असते. या मूर्तींना नैसर्गिक रंग देता आला तर मात्र या मूर्ती खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक होतील.
मूळ प्रश्न अजून अनेकांना समजला नाही. शाडु मातेची आज आपल्याकडे एवढी उपलब्ध आहे का? ही माती आपण बनवू शकत नाही. ही माती किनारपट्टीवरील प्रदेशात थोडीफार सापडते. शाडुच्या मातीला मर्यादा आहेतच, शिवाय किमती जास्त असल्यामुळे, आज तरी शाडुच्या मूर्तींना सुद्धा नैसर्गिक रंग न वापरता रासायनिक रंगच वापरतात. यामुळे रासायनिक रंगामुळे प्रदूषण होतच आहे.
आपल्या संशोधन संस्थांनी व वैज्ञानिकांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक पाहणे गरजेचे आहे. मला तर वाटते प्लास्टर ऑफ पॅरिसला रासायनिक प्रक्रिया करून असे बनवले पाहिजे की त्यापासून बनवलेली मूर्ती पाण्यात लगेच विरघळेल. तसे झाले तर गणेश मूर्तीचे विसर्जन लगेच करता येईल व मुख्य म्हणजे मूर्ती पूर्ण विघटन न झाल्यामुळे अर्धी मूर्ती किंवा मूर्तीचे अवशेष पाहावयास मिळतात, ते पाहावयास मिळणार नाही. दुर्दैवाने भारतात अश्या प्रकारच्या संशोधनाला एक तर कोणी तयार होत नाही किंवा त्यासाठी सरकारी पातळीवर निधी उपलब्ध करून दिला जात नाही. मात्र अश्या ‘पीओपी’ ची निर्मिती शक्य आहे की जीचे विघटन पाण्यामध्ये होऊ शकते.
पुण्यातील ‘राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे’च्या वैज्ञानिकांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे की, पीओपी गणेश मूर्ती आपण अमोनियम बायकार्बोनेट या रसायनामुळे पाण्यात विरघळू शकतो. हे रसायन अतिशय स्वस्त आहे. सर्वसाधारणपणे सोळा ते अठरा रुपये किलो. हे रसायन जर आपण पाण्यामध्ये टाकले व त्या पाण्यामध्ये पीओपी गणेशाची मूर्ती आपण फक्त ठेवून जरी दिली तरी ती काही तासांमध्ये पूर्णपणे विरघळून जाते. मुख्य म्हणजे या रासायनिक प्रक्रियेतून अमोनियम सल्फेट व कॅल्शियम कार्बोनेट रसायने तयार होतात. यातील अमोनियम सल्फेट हे अतिशय उपयुक्त असे रासायनिक खत आहे. याचा उपयोग आपल्याला घराच्या बागेतील झाडे किंवा आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या सामायिक जागेमध्ये झाडांना देण्यासाठी होऊ शकतो. दुसरे रसायन तयार होते ते कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच आपला खडू.
आपण थोडक्यात गणेश मूर्तींचे नैसर्गिक पद्धतीने विघटन करू शकतो. या संदर्भात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा वैज्ञानिकांनी एक तक्ता जारी केला आहे. त्यानुसार जर एक फुटाची पीओपीची गणेशाची मूर्ती असेल तर वीस ते बावीस लिटर पाण्यामध्ये चार किलोग्रॅम अमोनियम बायकार्बोनेट टाकायचे. मूर्ती तशीच ठेवून द्यायची व ती दोन-तीन दिवसात पाण्यामध्ये विरघळून जाईल. त्याचप्रमाणे जर श्री गणेशाची मूर्ती दीड फूट असेल तर ४० ते ४५ लिटर पाण्यामध्ये सहा किलोग्राम अमोनियम बायकार्बोनेट टाकायचे.
रासायनिक प्रयोगशाळेने विकसित केलेल्या या पद्धतीप्रमाणे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी येथील रोटरी क्लब गेल्या अनेक वर्षांपासून पीओपी मुर्तींचे विघटन करण्याचा हा सामाजिक प्रकल्प राबवत आहेत. याविषयी बोलताना २०१८-१९ मधील रोटरी क्लब ऑफ लिंक टाऊन, ऐरोली, मुंबई येथील डॉ. बाळासाहेब उफाडे म्हणाले की हा प्रकल्प आम्ही स्वतः आमच्या समोर राबवला आहे व तो यशस्वी होतो. खूप मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबवण्याची गरज आहे. त्याकरता आवश्यक ते सहाय्य प्रशासनाकडून मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
थोडक्यात काय पर्यावरण पूरक गणेश उत्सव ही निश्चितच काळाची गरज आहे. विज्ञानाला अनेक गोष्टी शक्य आहेत, फक्त पाठ पुराव्याची गरज आहे.
डॉ दत्ता पोंदे
७३८७९००७००






