“मुंबई असो की नसरापूर” —-🤫—-

“मुंबई असो की नसरापूर”
—-🤫—-
कलंक लावून भाळी तुझ्या ग
डोळ्यात फेकला जातो धूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर…सैतान हिंडतो राजरोस अन्
घरात कोंडली जाते सून
रस्ता, पेठ अन् गल्लोगल्लीत
दिवसाढवळ्या होतो खून
भोगवस्तू तू, समजून तुजला
अत्याचाराला येतो पूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर….आई मागते भीक दयेची
स्वतःस संपवून घेतो बाप
तरुणपणातच द्यावा लागतो
खांदा लेकीला, कसला शाप..?
अशा करंट्या मानसिकतेने
मनात तुझ्या तू खुशाल झूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर….मारले जाते कोवळ्या जीवाला
राॅकेल, पेट्रोल, एॅसीड टाकून
वळू पोसला जातो इथला
गुन्हा ठेवला जातो झाकून
भररस्त्यावर करती हल्ले
तरी लागेना ताकास तूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर….लुटल्या जाती लेकीबाळी
मिडियात त्यांची नुसती चर्चा
षंढ इथल्या व्यवस्थेतून
निघतो फक्त कॅन्डल मोर्चा
अपायावर उपाय न करता
होऊन जाते चक्काचूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर….संस्काराचा घोळ झाला
संस्कृतीची झाली होळी
रात्र असो की दिवसाढवळ्या
माणसं मरती खाऊन गोळी
कुठवर सहन करणार आता
घर तुझेही नाही दूर
हैवान झालाय माणूस इथला
मुंबई असो की नसरापूर….
– हनुमंत चांदगुडे
9130552551
…..
*कवितेत बदल न करता, जशी आहे तशी कविता शेअर करु शकता🙏🏼*




