सद्भावना सायकल यात्रा नांदेड ते आहिल्यानगर वृत्तांत क्र.3.

सद्भावना सायकल यात्रा क्रमांक 11, दिवस आणि वृत्तांत क्र.3
तिरंगा आणि संविधान,
यांचाच हवा अभिमान…
परभणी, दिनांक 2 जानेवारी 2026
आपल्या जातीचा , धर्माचा आणि भाषेचा अहंकार बाळगणाऱ्यांची संख्या भारतात वाढत चालली आहे. त्यामुळे नजीक भविष्यात *भारतीय* हीच देशातील सर्वाधिक अल्पसंख्यांक जमात ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ,असे प्रतिपादन सय्यद मीर यांनी केले.भारतीय सीमेवर देशासाठी पराक्रम गाजवलेले माजी सैनिक आणि निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात समर्पित योगदान देणारे अण्णांचे सहकारी म्हणून सय्यद मीर हिंगोली जिल्ह्यात ओळखले जातात.
नांदेड ते अहिल्यानगर या मार्गावरील अकराव्या सद्भावना सायकल यात्रेला हिंगोली शहरात हिरवा झेंडा दाखवून निरोप देताना सय्यद मीर काल भावनावश झाले. प्रत्येक सायकल यात्रीचा त्यांनी हार घालून आणि गळाभेट घेऊन सत्कार केला.
ते यावेळी म्हणाले की,
” तिरंगा आणि संविधान,
यांचाच फक्त प्रत्येकाला अभिमान असायला हवा. बाकी सर्व अभिनिवेश देश आणि समाजाला द्वेष आणि हिंसा याकडे घेऊन जातील .बहुविधता हा देशाचा आत्मा असून तो नष्ट झाला तर देशाची संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात येऊ शकते…,”
.हिंगोली शहरातील महावीर भवनासमोरून काल सकाळी हिंगोलीकरांनी सायकल यात्रेला निरोप दिला .30 किलोमीटर अंतरावरील औंढा नागनाथ येथे भोजनाची सोय स्थानिक नागरिकांनी केलेली होती. सामाजिक कार्यकर्ते अनिल अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन जितेश मेहता ,सुमेध मुळे , महेंद्र मुळे,नागनाथ मोतीराम मुळे या मित्रांच्या मदतीने भोजन आणि प्रबोधन,- संवादाचा कार्यक्रम आयोजित केला.
जितेश मेहता यांचा परिवार येथे *नटराज* हे शाकाहारी हॉटेल चालवतो. त्यांच्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणीही बाहेरचा वेटर किंवा कामगार कामाला नाही सर्व मेहता कुटुंबीय स्वयंपाक आणि हॉटेलशी निगडीत सर्व कामे स्वतःच करतात. सायकल यात्रेंसाठी त्यांनी घरगुती जेवणाचा चविष्ट बेत केला होता. सर्व मेहता कुटुंब प्रत्येकाला आग्रहाने आणि पोटभर जेवायला वाढत होते. जेवण झाल्यावर त्यांच्या हॉटेलच्या दारात, रस्त्यालगत सद्भावना यात्रेची गाणी, घोषणा यांचा धमाका केला. अनेक लोक उत्सुकतेने लगेच गोळा झाले. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे . म्हणून भारतातील नामवंत तीर्थक्षेत्र आहे. येथे देशाच्या सर्व भागातील भाविक भक्त येत असतात. सद्भावना यात्रेचा जयघोष सर्वांना आकर्षित करून गेला.या प्रवासात अनेक लोक रस्त्यात थांबवून यात्रेची माहिती विचारतात . बहुतेकांचा आग्रह हा आम्ही जेवण करून जाण्याचा किंवा किमान चहा – नाश्त्यासाठी थांबण्याचा असतो. तरुण लोकांसोबत कॉलेज किंवा शाळेच्या दारासमोर मोठा कार्यक्रम होणार असेल तरच आम्ही थांबतो.पण हिंगोली – परभणी रस्त्यामधील जवळा बाजार येथे परिवहन महामंडळात नोकरी करणाऱ्या सुरेश नवले आणि रंगनाथ वाघमारे यांच्यासमोर आमचा नाईलाजच झाला. त्यांनी सायकल यात्रा पाहिली आणि जवळाबाजार येथे अवघ्या वीस मिनिटात एका कार्यक्रमाचे बाजारपेठेत नियोजन केले. एसटीमधील नोकरीमुळे त्यांचा अख्ख्या महाराष्ट्रात संचार झाला आहे .त्याताई नगर जिल्ह्यात जास्तच. या गावच्या सरपंच सौ. स्वाती दत्ताराव अंभोरे , त्यांचे पती दत्ताभाऊ आणि या गावातील सर्व ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी आम्हाला थांबवले. मोठा सत्कार केला. आमच्या सोबत सद्भावनेची गाणी म्हटली. घोषणा देत भेदभाव मुक्त समाजाचा संकल्प मजबूत केला .
लायन्स क्लब की कामना
=================
परभणी येथील जागृती कॉलनीत जागृती कार्यालयात
लायन्स क्लब ऑफ परभणी आणि स्थानिक सायकलिंग असोसिएशन यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि भोजन निवासाचे व्यवस्था केलेल्या होत्या.
यामध्ये अरुण टाक,
उदयराज जैन , गंगाधर पवार ,रंजीत कारेगावकर,
विष्णू मेहता, नीरज पारख, राजेश्वर वासलवार ,
प्रा. राम कराळे ,पी.एस बरदाळे, विजय श्रीमाळी यांचा सहभाग होता. क्लबचे नूतन अध्यक्ष
नितीन पारवेकर ,अनिल कनसुलकर, कौशल्या मेहता , सविता आणि कोमल महावलकर ,दीपक पाठक ,रविकिरण शिराढोणकर , प्रा.नितीन लाटेर, ज्ञानराज खटिंग ,शैलेश शोलरलक हे आमच्या सेवेत होते.सायकल यात्रेची नेमकी गरज ओळखून येथील उद्योजक विलास कौसदीकर यांनी अत्यंत दर्जेदार चष्मे सर्व सायकलस्वारांना भेट म्हणून दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकारी
एम.एन बंडेवार आणि
सुनील मुदगलकर आदी उपस्थित होते.
सायकल यात्रेत नाशिक येथून सहभागी झालेले श्री. रमेश धोत्रे यांची कन्या सविता येथे राहते. तीच्यामुळे सर्वच व्यवस्था उत्तम झाल्या.रात्रीच्या सर्व धर्म प्रार्थना उपक्रमात लायन्स आणि सायकलिंग क्लबचे सर्व सदस्य आणि परभणीकर सहभागी झाले.

आणि जीवन बदलले
==============
यात्रेत भेटणारे अनेकजण आपल्या प्रेरक आत्मकथा आणि जीवनप्रवास सांगत असतात.लायन्स क्लबचे प्रमुख उदयराज जैन यांनी त्यांची कहाणी सांगितली.परभणी मध्ये होमिओपॅथीचे कॉलेज ,खूप मोठे ज्वेलरी शॉप , मालमत्तांची खरेदी विक्री आणि बांधकाम असा उदयराज यांचा व्यवसायांचा खूप मोठा पसारा आहे.चार वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली . डॉक्टरांनी सांगितले की, मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. यापुढे सतत डायलिसिस घ्यावे लागेल.
उदयराज यांनी त्याच क्षणी आयुष्याचे मोठे निर्णय घेतले. सर्व प्रकारची व्यावसायिक काम सोडून दिली. उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यांच्या उपयोगी पडावा ,हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा गंभीर आजार औषधांनीच पूर्ण आटोक्यात आला. उदयराज यांनी सांगितले की, इतरांची निरपेक्ष सेवा केली तर किती गंभीर आजार
किमान आटोक्यात नक्कीच येतात ,आयुष्य नुसतेच वाढत नाही तर समाधानी होते .. सायकल यात्रेत सकाळी सात वाजता ते त्यांच्या घरातून आम्हा सर्वांसाठी चहा घेऊन आले. पण या पार्श्वभूमीमुळे कोणत्याच गोष्टीसाठी त्यांचे आभार मानू नये ,ही विनंती त्यांनी केली. हृदय फक्त 20 टक्के चालू असतानाही स्नेहालयाच्या सर्व यात्रांमध्ये सहभागी झालेले तसेच त्रीखंडात सायकल चालवणारे नाशिकचे वराडे काका, अशा अनेक प्रेरणादायक जीवंत कहाण्या सायकल यात्रेचे चैतन्य वाढवित आहेत….
सायकल यात्रेत चहा, नाश्ता, जेवण ,निवासाची व्यवस्था सर्व व्यवस्था स्थानिक संयोजक उस्फुर्तपणे आणि उत्तम करीत आहेत.
सद्भावनेचे वातावरण निर्माण होण्याची गरज सर्वजण व्यक्त करतात.
सर्वधर्म प्रार्थनेत मोकळेपणाने सहभागी होतात.
त्यातूनच यात्रेचा उद्देश बळकट होत चालला आहे..




