Breaking
ब्रेकिंग

निपेऱ्या’ :माती माणूस आणि जिद्दीचा प्रवास ✍🏻 कल्पना दांगट, पुणे

0 1 2 1 9 4

निपेऱ्या’ :माती माणूस आणि जिद्दीचा प्रवास
✍🏻 कल्पना दांगट, पुणे

अभिप्राय क्रमांक -38

काही माणसांच्या आयुष्यात परिस्थिती इतकी कठीण असते की, त्यांच्या वाट्याला आलेलं जगणं पाहताना प्रश्न पडतो की,हा माणूस एवढं सगळं सहन करून उभा राहिला तरी कसा?
आणि काही पुस्तकं अशी असतात की,ती वाचताना आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं.

निपेऱ्या’ हे असंच एक पुस्तक आहे.हे पुस्तक वाचताना एका व्यक्तीची कथा वाचत असल्याची भावना होत नाही; उलट,आपल्या आजूबाजूला संघर्ष करत जगलेल्या असंख्य माणसांची,ग्रामीण भागातील कष्टकरी तरुणांची आणि हरवत चाललेल्या मातीशी नातं सांगणाऱ्या एका पिढीची कहाणी आपण वाचत आहोत,असं सतत जाणवत राहतं.
‘निपेऱ्या’ म्हणजे गाडून घेतल्याची गोष्ट नाही; तर खडकाळ परिस्थितीच्या मुरमाड मातीतून स्वतःला उगवून घेण्याची गोष्ट आहे.

१९८२ साली ग्रामीण भागात दुष्काळ पडला. पेरणी झाली नाही आणि त्याच काळात एका बाळाचा जन्म झाला.पेरणी न झाल्यामुळे त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं—‘निपेऱ्या’.ही गोष्ट वाचताना आश्चर्यही वाटतं आणि मनाला खंतही होते.ज्याने अजून डोळे उघडून ही सृष्टी पाहिलेली नाही,त्या इवल्याशा जीवाच्या नावाला दुष्काळाचं सावट का जोडावं,असा प्रश्न पडतो.
पण नियतीने ज्याच्या जन्माला ‘निपेऱ्या’ म्हटलं,त्याच माणसाने पुढे आपल्या कर्तृत्वाने त्या नावाला एक वेगळाच अर्थ दिला.ज्याच्या जन्माच्या वेळी पेरणी झाली नव्हती,त्याने पुढे अवघ्या सृष्टीत हिरवाईची पेरणी करण्याचा ध्यास घेतला.म्हणूनच या नावात सुरुवातीला जाणवणारी कमतरता पुढे कर्तृत्व, जिद्द आणि आशेचं प्रतीक बनते.

वृक्षमित्र श्री विष्णू वाघ सर यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांना चाळीस कथांच्या माध्यमातून शब्दरूप दिलं आहे. हे आत्मकथनाच्या अंगाने जाणारं लेखन असलं तरी ते केवळ लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यापुरतं मर्यादित राहत नाही.निपेऱ्याच्या जन्मापासून सुरू होणारी ही कथा त्याच्या बालपणातील खडतर परिस्थिती,गरिबी,दुष्काळ,उपेक्षा,शिक्षणासाठीची धडपड,नात्यांची ऊब,गावातील माणसं,मैत्री,कष्ट,स्वाभिमान आणि आयुष्याशी दोन हात करण्याच्या जिद्दीपर्यंत पोहोचते.

बालपणीच्या अनुभवांतून माणसाची जडणघडण कशी होत जाते,हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवतं.परिस्थितीने निपेऱ्याला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक अडचणीने त्याला काहीतरी शिकवलं.चुकांमधून शिकत जाणं,संकटांतून घडत जाणं आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रामाणिकपणा,स्वाभिमान आणि माणुसकीची कास न सोडणं हा या संपूर्ण लेखनाचा मूलस्वर आहे.

‘मामाचं पोतं’, ‘गिलक्याचे भजे’, ‘दहा रुपयांचा ट्रॅक्टर’, ‘कैरी झाली वैरी’, ‘मयतावरच्या लेमन गोळ्या’, ‘चंद्रि हरणी आणि म्हशा डोंगर’, ‘क्रांतीचा बाप्पा’, ‘पहिलं भाषण आणि पहिली वहाण’, ‘दळणाने दिले वळण’, ‘३५ किलोचा सुरक्षारक्षक’, ‘रक्तरंजित पटरी’ अशा अनेक कथा निपेऱ्याच्या जीवनातील वेगवेगळे पदर उलगडतात.
‘मामाचं पोतं’ वाचताना बालपणीचा खोडकरपणा, मस्ती आणि नात्यांमधील जिव्हाळा आठवतो. मामाने शिक्षा म्हणून पोत्यात कोंडून ठेवलेला निपेऱ्या आणि त्या प्रसंगातून त्याच्यात झालेला बदल मनाला भावतो.आजही निपेऱ्याचा स्वभाव गोड,हसतमुख आणि माणसं जोडणारा आहे,याची बीजं त्यांच्या बालपणातच दिसतात.

‘दहा रुपयांचा ट्रॅक्टर’ ही कथा तर ग्रामीण गरिबीचं अत्यंत बोलकं चित्र उभं करते.जत्रेतून दहा रुपयांचा खेळण्याचा ट्रॅक्टर घेण्याची इच्छा आणि दुसरीकडे घरात पोटाची खळगी भरणं ही असलेली खरी गरज या छोट्याशा प्रसंगातून त्या काळातील गरिबी आणि पालकांनी दिलेले व्यवहाराचे संस्कार जाणवतात.आजच्या मुलांना छोट्या गोष्टींचा आनंद किती मोठा असतो, हे कदाचित या कथेतून नव्याने समजेल.

‘कैरीच झाली वैरी’मधील प्रसंगही मनात अगदीच घर करून राहतो. दुसऱ्याच्या वस्तूला परवानगीशिवाय हात लावल्याने झालेला अपमान निपेऱ्याच्या मनावर कायमचा ठसा उमटवतो आणि त्यातून तो आयुष्यभराचा धडा शिकतो.‘मयतावरच्या लेमन गोळ्या’ वाचताना मात्र निरागस बालपण डोळ्यांसमोर उभं राहतं. पैशाची किंमत, मित्रांची सोबत आणि छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद आजच्या संपन्न पण धावपळीच्या जगाला विचार करायला लावतो.

‘चंद्रि हरणी आणि म्हशा डोंगर’सारख्या कथांमधून डोंगर,नदी,धबधबे, जनावरं आणि निसर्गाशी असलेलं ग्रामीण माणसाचं जिव्हाळ्याचं नातं समोर येतं.विंचवाचा दंश असो,बहिणीच्या लग्नासाठी शेळ्या विकण्याची वेळ असो किंवा शिक्षणासाठी करावी लागलेली धडपड असो,प्रत्येक प्रसंगात जगण्याची धडपड जाणवते.

‘पहिलं भाषण आणि पहिली वहाण’मधून स्वप्न पाहण्याची सुरुवात दिसते,तर ‘दळणाने दिले वळण’मधून शिक्षणाच्या वाटेवरील अडथळे आणि मनात रुजलेली मोठी स्वप्नं समोर येतात.अशा छोट्या छोट्या घटनांतून निपेऱ्याचं व्यक्तिमत्त्व टप्प्याटप्प्याने घडत जातं.

या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा.लेखकाने ग्रामीण जीवनाला शहरी किंवा कृत्रिम भाषेचा मुलामा दिलेला नाही.गावरान बोली, ग्रामीण शब्दसंपदा,सहज संवाद आणि साधी-सोपी वाक्यरचना यामुळे कथा अगदी आपल्याच घरात घडत असल्यासारख्या वाटतात.भाषा वाचताना गावची माती,माणसं,घरं,शेती,सण-उत्सव आणि त्या काळातील ग्रामीण जीवनशैली डोळ्यांसमोर उभी राहते.बोलीभाषा येथे केवळ भाषेचा प्रकार नसून ग्रामीण अस्सलतेचा आत्मा बनली आहे.

‘निपेऱ्या’मध्ये गरिबी आहे; पण गरिबीपुढे झुकलेला माणूस नाही.
संघर्ष आहे; पण पराभवाची मानसिकता नाही.
वेदना आहेत; पण त्यातून उगवलेली आशा देखील आहे.
परिस्थितीशी झुंज देत स्वतःच्या कष्टावर जगणारा आणि कुणापुढे न झुकणारा निपेऱ्या म्हणूनच वाचकाच्या मनात ठसतो.
आज आधुनिकतेच्या नावाखाली आपण हळूहळू आपल्या मातीपासून, गावापासून आणि निसर्गापासून दूर जात आहोत.अशावेळी ‘निपेऱ्या’ आपल्याला माणूस आणि निसर्ग यांचं नातं पुन्हा आठवून देतो.

लेखक स्वतः वृक्षप्रेमी असल्याने त्यांचा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा विचार पुस्तकाच्या पानोपानी जाणवतो.वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,पर्यावरण आणि माणुसकीचा धर्म यांची सांगड त्यांच्या जीवनात आणि लेखनात सुंदरपणे घातली गेली आहे.
कोरोना काळातील श्वासाचे महत्त्व नव्याने जाणवल्यानंतर नैसर्गिक ऑक्सिजनसाठी वृक्षारोपणाची चळवळ उभी करण्याची त्यांची धडपड आणि त्यातून उभी राहिलेली वृक्षमित्र फाउंडेशन,सिन्नर ही वाटचाल त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते.पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शाल-गुलाबाऐवजी झाडांची रोपे भेट देण्याची कल्पनाही त्यांच्या विचारांची प्रामाणिकता सांगते.
लेखकाची वाचनसंस्कृती जपण्याची धडपडही तितकीच कौतुकास्पद आहे. विज्ञानाचे शिक्षण,नोकरी,वाचन,ललित लेखन,कथा आणि मुक्तछंद कविता यांची आवड आणि त्याचबरोबर सामाजिक पातळीवर वृक्षारोपण-वृक्षसंवर्धनासाठी सुरू असलेलं काम हे लेखकाचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. माणसं जोडण्याची त्यांची निरागस वृत्ती आणि आपल्या अवतीभवती जे चांगलं आहे ते आत्मसात करण्याची वृत्ती त्यांच्या लेखनातूनही जाणवते.

‘निपेऱ्या’ची अर्पणपत्रिकाही मनाला स्पर्शून जाते. आजी,आई-वडील,चुलते कै.बबन नाना, माती आणि हिरवाई जपणारे निर्मळ हात यांना केलेलं अर्पण लेखकाच्या मनातील कृतज्ञता व्यक्त करतं.
प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांची प्रस्तावना ग्रामीण साहित्याच्या परंपरेचा संदर्भ देत ‘निपेऱ्या’चं साहित्यिक महत्त्व अधोरेखित करते.ग्रामीण साहित्य कमी होत असताना ग्रामीण जीवन,बोलीभाषा,शेतकरी-कष्टकरी माणूस आणि त्यांच्या संघर्षांना केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन निश्चितच महत्त्वाचं आहे. आनंद यादव यांच्या ‘झोंबी’, विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’, कैलास दौंड यांच्या ‘कापूसकाळ’ यांसारख्या ग्रामीण साहित्यपरंपरेशी या लेखनाचा धागा जोडला जातो.

पुस्तकाला पेन पब्लिशिंग हाऊसने दिलेलं देखणं रूप,मुखपृष्ठावरील हिरवाई आणि ‘निपेऱ्या’ या नावाचा आशय यांचा सुंदर मेळ साधला आहे.
‘निपेऱ्या’—ज्याची पेरणी झाली नाही; पण ज्याने पुढे सृष्टीत हिरवाईची पेरणी केली, हा विरोधाभास मुखपृष्ठापासून संपूर्ण पुस्तकभर जाणवत राहतो.
‘निपेऱ्या’ वाचताना अनेक ठिकाणी आपलं स्वतःचं बालपण आठवतं. काही प्रसंग हसवतात,काही मन हळवं करतात,काही डोळ्यांत पाणी आणतात आणि काही प्रसंग जीवनाकडे नव्याने पाहायला शिकवतात. कारण निपेऱ्याची माणसं केवळ पुस्तकातील पात्रं राहत नाहीत; तर ती आपल्या गावातील,आपल्या घरातील किंवा आपल्या आयुष्यात कधी ना कधी भेटलेली माणसं वाटू लागतात.
म्हणूनच ‘निपेऱ्या’ हा केवळ एका व्यक्तीचा जीवनप्रवास नाही. तर तो ग्रामीण महाराष्ट्राच्या एका पिढीचा जिवंत दस्तऐवज आहे.तो गरिबीतही जपलेल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे.तो संघर्षातून उमललेल्या जिद्दीचा प्रवास आहे.तो मातीशी नातं सांगणाऱ्या माणसांचा आवाज आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो माणुसकी आणि हिरवाईची पेरणी करणारा आशावादी प्रवास आहे.

जन्माच्या वेळी पेरणी झाली नाही म्हणून ‘निपेऱ्या’ नाव मिळालं; पण आयुष्यभर कष्ट करून त्याने स्वतःला उगवलं आणि पुढे असंख्य आयुष्यांत, मनांत आणि मातीमध्ये हिरवाई पेरली.
यापेक्षा सुंदरपणे ‘निपेऱ्या’ची ओळख आणखी काय करून देता येईल?
वृक्षमित्र श्री विष्णू वाघ सरांच्या या पहिल्या साहित्यिक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या लेखणीतून अशीच मातीचा गंध असलेली, माणसांच्या मनाला भिडणारी आणि समाजात माणुसकीची हिरवाई पेरणारी साहित्यनिर्मिती पुढेही होत राहो, हीच मनापासून सदिच्छा. 💐
‘निपेऱ्या’ नक्की वाचावा 🙏🏻कारण या पुस्तकात एका माणसाची कथा वाचताना कुठेतरी आपलीच कथा सापडते. 👍🏻

कल्पना दांगट, पुणे

घरपोच पुस्तकासाठी
7020303738, 9850676667
पेन पब्लिशिंग हाऊस #देवाझिंजाड
9890697098

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे