‘आमच्या संस्कृतीची माय असते नदी …’ कविवर्य नारायण सूर्वे अभिवादन कविसंमेलन रंगले

‘आमच्या संस्कृतीची माय असते नदी …’
कविवर्य नारायण सूर्वे अभिवादन कविसंमेलन रंगले
सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समितीचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर :
सुखना बचाओ जनआंदोलन व संघर्ष समिती ही सुखना नदी पुनरुज्जीवन व संवर्धन करण्यासाठी कार्यरत असून या जनआंदोलनाचा एक भाग म्हणून सातत्याने नदी व समाज यांच्यात एक ऋणानुबंध तयार होऊन समाज नदिशी जोडला जावा, नदीविषयक जाणिव जागृती वाढावी या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुखना काठी आयोजित केले जातात. २ मे रोजी कामगार दिनाच्या निमित्त व कविवर्य नारायण सूर्वे यांच्या जमशताब्दी निमित्त अभिवादन कवि संमेलन डॉ. सुभाष बागल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. डॉ. सर्जेराव जिगे उदघाटक होते. मंचावर समितीचे अध्यक्ष अशोकराव काळे, नगरसेवक शिवाजीराव दांडगे, डॉ. शिवाजी हुसे, सुरेश जुए पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव काळे यांनी केले. या प्रसंगी शेतकरी, कामगार, नदी व पर्यावरण आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे कवि संमेलन एकापेक्षा एक कवितांच्या सादरीकरणाने रंगले. दिपक नागरे यांनी नाही सोसवत हाल, वणवा डोक्यात पेटला, शेतकऱ्यांच्या जीवनी अंधार दाटला या कवितेतून शेतकरी कामगारांचे दुःख मांडले. आर. पी. शिखरे, यांनी सुंदर ही निसर्गाची रित ना भेद करतो ना प्रित ही निसर्ग कविता सादर केली माधुरी चौधरी यांनी नदी विषयक ‘ नित्य नेहमी ती जाऊन बसते, नदीच्या काठावर ‘ हे सुरेख कविता सादर करून नदी व स्त्री यांच्या नात्यावर प्रकाश टाकला . अशोक शेवगण यांनी ‘ माझी जे तुम्हाला माझी व्यथा सांगतील याच आठवणीसाठी देह जपून ठेवले, या कवितेतून मानवी जीवनाची व्यथा मांडली. कवी हबीब भंडारे यांनी खोटे गुन्हे तक्रारी दाखल होऊ लागले की माणसं विसरतात सलोख्याची भाषा ही आजच्या सामाजिक वास्तववावर प्रहार करणारी कविता सादर करून अंतर्मुख केले. डॉ. सुशिल सातपुते यांच्या मी पाहत नाही चित्रपट थेटरवरचा पाहत असतो पत्रकार परिषदा आणि चॅनल वरच्या चर्चा ही विदारक भाष्य करणारी कविता सादर केली. डॉ. शिवाजी हुसे यांनी नदी अशी खळखळून वाहतांना दिसली की मन आनंदून जाते ‘ ही नदीच्या निर्मळ वाहण्याची कविता सादर केली. तर डॉ. सर्जेराव जिगे यांच्या ‘ आमच्या संस्कृतीची माय असते नदी ‘ ही नदी व मानवी संस्कृती आणि लोकजीवनावर भाष्य करणारी कविता सादर करून रंगत आणली. अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. सुभाष बागल यांनी कविवर्य नारायण सूर्वे यांच्या जीवन व कवितेवर भाष्य केले. तसेच मी अंकुरत रहावे जीवनभर मातीच्या कणासाठी जाळणाऱ्या उन्हासाठी ‘ ही माती व नाती, माणूस यांच्यातील भावबंधावर प्रकाश टाकणारी कविता सादर करून समारोप केला. अशोकराव काळे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास रमेश बोडारे, लहु तुपे , महादेव बोंडारे यांच्यासह कामगार उपस्थित होते. एकापेक्षा एक सरस कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली. मान्यवरांच्या हस्ते डॉ शिवाजी हुसे संपादित ‘ धोंडी धोंडी पाणी दे ‘ या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी डॉ. सुशिल सातपुते यांनी केले, तर आभार समितीचे सहसचिव सुरेश जुए यांनी आभार मानले.






