वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे l पक्षीही सुस्वरे आळविती ll
कोपरगाव – प्रतिनिधी
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे l
पक्षीही सुस्वरे आळविती ll
संत तुकाराम महाराजांनी १६ व्या दशकात वृक्षांच महत्त्व अगदी सोप्या भाषेत सांगितले , वृक्ष म्हणजे जणू काही आपले सगे सोयरे आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे हे ४०० वर्षांपूर्वी सांगितले होते तरीही आजही बऱयाच लोकांना पाहिजे तितके वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजलेले नाही, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन काळाची गरज बनली आहे. त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे.
पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर, सर्व सजीवांचा नैसर्गिक परिसर म्हणजेच पर्यावरण. पर्यावरण संवर्धनासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, कारण या उन्हाळ्यात तापमान ४५ ते ५० डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलेले आपण बघितले आहे.
हे तापमान जर कमी करावयाचे असेल तर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करण्याची गरज नाहीये फक्त आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला प्रत्येकाने एकच वृक्ष लावायचा आहे व तो जगवायचा आहे म्हणजे आपल्या देशात जवळपास १३० कोटी लोकसंख्या आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला १३० कोटी वृक्षांची पर्यावरणात भर पडेल. दुसरं प्रत्येक व्यक्ती जेव्हा ह्या जगाचा निरोप घेतो त्या व्यक्तीची आठवण एक चिरा, एक स्मारक म्हणून एक वड किंवा पिंपळ वृक्षांची लागवड करायची व त्यांचे संवर्धन करायचे, तिसरं प्रत्येक मुलीचा विवाह होतो तेव्हा तिने माहेरी तिची कायमची आठवण म्हणून एक वृक्ष लावायचा आहे , आणि चौथे कोणालाही कोणत्याही कार्यक्रमात मग तो कार्यक्रम वर्षेश्रद्ध असो गंगापूजन असो वाढदिवस असो विवाह असो किंवा जागरण गोंधळ असो शाल टोपी देण्याऐवजी एक वृक्ष भेट द्यायचा ( शाल टोपी एक सन्मान म्हणून एका कार्यक्रमात सर्वानी मिळून एक देण्यास हरकत नाही ) असं जर प्रत्येकाने मनाशी ठरविले पर्यावरणात खूप वृक्षांची भर पडेल व नक्कीच तापमानात घट होईल , पर्जन्यमान वाढेल. प्रत्येकाने एक प्रतिज्ञा करायची मी झाड तोडणार नाही आणि कोणाला तोडुही देणार नाही.
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही एक लोकचळवळ बनली पाहिजे आणि ह्या वृक्षचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरबारी गावपातळीवर वेगवेगळे पुरस्कार ठेवले पाहिजे व जो वार्षिक वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करेल त्याला करामध्ये सवलत दिली पाहिजे, जास्तीत जास्त सौरऊर्जा वापरून जंगल तोड रोखली पाहिजे जेणेकरून आहे ते जंगल कमी होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
कोरोना काळात प्राणवायू ऑक्सिजन ची किमंत किती होती हे जवळपास सर्वांनी अनुभवलंय एका दिवसाला कमीत कमी दोन हजार रुपये घेत होते म्हणजे एका वर्षाला आपण एक व्यक्ती साथ लाख तीस हजार रुपयांचा निसर्गातुन मोफत ऑक्सिजन घेतो जर मग एवढा पैसा आपला वाचतो तर मग प्रत्येक व्यक्तीने किमान सात हजार रुपये तरी वर्षाला वृक्ष लावण्यासाठी व संवर्धनासाठी खर्च करायला काय हरकत आहे बघा विचार पटत असेल तर आजपासून तरी सर्वानी हा उपक्रम सुरू करावा .
पर्यावरणात प्रदूषण होऊ नये म्हणून प्लास्टिक चा वापर कमीत कमी केला पाहिजे आज प्लास्टिकच्या अतिरेकामुळे शहर भकास होत आहे जिकडे पाहावे तिकडे प्लास्टिक चे गंजच गंज पडलेले आहेत ते कधीच कुजत नाही त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, वृक्षांच्या मोठ्या पानांपासून नैसर्गिक द्रोण पत्रावळ तयार केली पाहिजे की जी पूर्वीपासून वापरत होते पण चांगलं दिसावं म्हणून प्लास्टिक वापरू लागले ते बंद केलं पाहिजे.
आता तरी हाचि उपदेश l
नका करू नाश आयुष्याचा ll
संत तुकाराम महाराज उपदेश करतात मानव कल्याणासाठी, आज तरी, आता तरी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हाच उपाय आहे, आणि पर्यावरणाचा समतोल राहीला नाही तर सर्व सजीव जातींचा आयुष्याचा नाश निश्चित आहे.
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहीम जर शाळेपासून सुरुवात केली , तर विद्यार्थ्यांच वय कमी असते त्या वयात त्यांच्या मनावर बिंबल गेलं की वृक्षलागवड ही चळवळ निश्चितच यशस्वी होईल आणि पर्यावरणात बदल नक्की होईल, वृक्षमित्र फाऊंडेशन ने हे काम हाती घेतले आहे, पाठ्यपुस्तकांत पाठ समाविष्ट करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांना समजेल परिणामी वृक्षलागवडीत नक्कीच वाढ होईल. सध्या जी गरज नसताना फक्त शेतात ववसा होतो म्हणून वृक्षतोड होते ती कुठेतरी थांबवायला हवी, शेतात ववसा कमी करण्यासाठी ढाहळा पद्धत आहेच. ववसा हा शेताला होणारा ववसा नाही तर मानवी जीवनाला प्राणवायू देणार जीवन आहे.
वनविभाग वृक्षलागवड दरवर्षी खूप करते पण त्याचे संवर्धन जसे पाहिजे तसे होत नाही त्यामुळे त्यांनी ह्याकामात समाजातील असणाऱ्या वृक्षप्रेमी व्यक्तींना तसेच सर्व समाजाला सामावून घेऊन वृक्षसंवर्धनाची जबाबदारी टाकली पाहिजे तसेच स्थानिक प्रशासनाला ही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी दिली गेली पाहिजे, समाजात जनजागृती करणे देखील खूप महत्त्वाचे आहे , प्रत्येक गावच्या मालकीच्या असणाऱ्या रिकाम्या जागांवरती शेततळे बांधून , बाकीच्या जागेत वृक्षलागवड केली व वृक्षांना ठिबक सिंचन करून वृक्षसंवर्धन केले तर नक्कीच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
कारखान्यांमध्ये बॉयलरसाठी जो कच्चा माल लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधावरील झाडे तोडली जाताहेत, इलेट्रिक करवतीने रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय ती थांबविणे खूप गरजेचे आहे, फक्त वृक्षतोड थांबली तरी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षांचे प्रमाण वाढेल कारण निसर्ग सगळं काही स्वतःहा करतो निसर्गसाखळी आहेच खूप मजबूत ती मानवाने तोडू नये,
प्रत्येक गावात जसे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत त्याच प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्तीचा एक समूह व त्याचा एक अध्यक्ष बनवून वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी दिली तर नक्कीच काही प्रमाणात बदल होईल, झाडं फक्त कागदावर न लावता प्रत्यक्षात जमिनीवर लावून पाणी देखील जमिनीवर घातले तर उजाड माळरानं हिरवेगार होतील,
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यानेच पर्यावरणाचा जास्तीत जास्त समतोल राखला जाईल, लोकांना मोकळा श्वास घेता येईल व मानवी जीवन अधिकाधिक सुखकर होईल .
????लेखक????
???? वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ????अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व वृक्षमित्र साहित्य परिषद.
दोडी बु ll सिन्नर ( नाशिक )
( ७०२०३०३७३८)